सुशिक्षित मराठा तरुणांनी पारंपरिक कृषी व पर्यटन व्यवसायात उतरावे – मराठा बिजनेस फोरम सिंधुदुर्ग
कणकवली
मराठा समाजातील सुशिक्षित तरुणांनी बीच पर्यटन, कृषी पर्यटन, फळबागायती व प्रक्रिया उद्योग यांसारख्या पारंपरिक कृषी आधारित व्यवसायात उद्योजक म्हणून पुढे यावे, यासाठी आवश्यक सर्व प्रकारची मदत व सहकार्य मराठा बिजनेस फोरम कडून करण्यात येईल, असे प्रतिपादन मराठा बिजनेस फोरम सिंधुदुर्गच्या बैठकीत करण्यात आले.
रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी कणकवली येथे मराठा व्यवसायिकांची बैठक संपन्न झाली. या बैठकीस रत्नागिरी येथील उद्योजक व कोकण प्रतिनिधी श्री. प्रसाद कदम यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी कोकणातील पर्यटन व कृषी क्षेत्रात असलेल्या संधींबाबत सविस्तर माहिती देत तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यवसाय वाढवावा, असे आवाहन केले.
या बैठकीस शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब सावंत, कणकवलीतील स्थानिक उद्योजक श्री. नंदू सावंत, श्री. अर्जुन गुरव, बिझनेस कन्सल्टंट श्री. राजेंद्र परब, सहकारी संस्थेचे श्री. लक्ष्मण वेंगुर्लेकर यांच्यासह अनेक उद्योजक व व्यावसायिक उपस्थित होते.
बैठकीत मराठा समाजातील तरुणांना उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण, नेटवर्किंग व आर्थिक संस्थांशी जोडण्याबाबत चर्चा करण्यात आली. अशा उपक्रमांमुळे कोकणातील स्थानिक उद्योजकतेला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
