18 जानेवारी जयंतीनिमित्त
स्व. प्रा. मधुकर केचे : वक्ते आणि लेखक
अमरावती मधील सर्व लेखक व कवींच्या माझा निकटचा संबंध होता व आहेही. कविवर्य श्री सुरेश भट प्रा. मधुकर केचे उद्धव ज.शेळके भाऊ मांडवकर प्रा. वसंत आबाजी डहाके प्रा. प्रभा गणोरकर बाबा मोहोड शरदचंद्र सिन्हा प्रा. पुरुषोत्तम नागपुरे डॉ. सुदाम सावरकर डॉ. सुभाष सावरकर हे आमच्या पूर्वीच्या काळातील नामवंत लेखक व कवी. या ना त्या निमित्ताने त्यांची जवळीक झाली व त्यामुळे आयुष्य समृद्ध झाले.
प्रा.मधुकर केचे यांची जवळीक होण्याचे वेगळे कारण होते. ते म्हणजे ते व मी एकाच महाविद्यालयामध्ये होतो. अमरावतीच्या मोर्शी रोडवर असलेल्या श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय आहे त्या महाविद्यालयात मी शिकलो. तिथेच नोकरीला लागलो .त्यामुळे केचेसरांशी अतिशय जवळच्या संबंध आला आणि तो उत्तरोत्तर वाढतच गेला.
एक उत्तम दिलखुलास वक्ते तसेच एक सुलभ सरळ लिहिणारे लेखक व कवी म्हणून त्यांचा नावलौकिक होता. लेखनामध्ये त्यांचा हातखंडा होता. आसवांचा ठेवा पुनवेचा थेंब दिंडी गेली पुढे या त्यांच्या तीन कवितासंग्रहांना लागोपाठ तीन वर्ष महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला. सतत तीन वर्ष काव्यसंग्रहाला राज्यपुरस्कार मिळालेला हा एकमेव कवी असावा.
अनेक वर्ष मी सरांकडे लेखनिक म्हणून काम केले. सर माझ्याच महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक होते. सुरुवातीला मी लाहोटी महाविद्यालयामध्ये कर्मचारी म्हणून रुजू झालो. सकाळी सात ते दुपारी एक मी महाविद्यालयात असायचा व एक नंतर केचेसरांकडे लेखनिक म्हणून जायचा. त्याचा एक फायदा मला झाला की माझे शुद्धलेखन उत्तम झाले. दुसरे म्हणजे माझ्या ठिकाणी असलेल्या साहित्य गुणांना प्रोत्साहन मिळाले. सरांच्या लिहिण्यामध्ये एकटाकीपणा होता. मी लेखनिक असताना मला आठवते सर भर भर सांगत जायचे .त्यांनी कधीही एखादे वाक्य सांगितले आणि नंतर बदलविले असे झाले नाही. एखाद्या माणसावर सरस्वती प्रसन्न असते असे म्हणतात. तसेच केचेसरांच्या बाबतीत म्हणावे लागेल.
पुढे सरांनी मराठीची टंकलेखन मशीन घेतली त्यामुळे माझे काम सोपे झाले. सर सांगायचे आणि मी टाईप करायचा हा सिलसिला सुरू झाला.
पुढे मी विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवनात राहायला गेलो. कॉलेज संपले म्हणजे सरांचे राठी नगरातील घर मी गाठत होतो . अनेक वेळा माझे जेवण खावण त्यांच्याकडेच व्हायचे .सर स्वतः चहा करून मला द्यायचे.साधी राणी आणि उच्च विचारसरणी याचे ते भक्त होते आणि ते तत्त्व त्यांनी शेवटपर्यंत पाळले.
सरांनी ऐपत असतानाही स्कूटर किंवा मोटरसायकल घेतली नाही. आपण पायी जातो तर लोक आपल्याला लिफ्ट देतात म्हणून त्यांनी सायकलचा आधार घेतला. ते सायकल फार कमी चालवायचे पण त्यांच्या सोबत सायकल असायची .ते सायकल धरून चालवायचे म्हणजे कोणी लिफ्ट देण्याचा प्रकार घडायचा नाही.
सौ मुक्तावहिनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला होत्या. त्यांची मुले सतेज शार्दुल सौरभ ही माझ्यासमोर लहानाची मोठी झाली. तेव्हा ती शाळेत शिकत होती. सर त्यांना बुकू आणि पिंकी म्हणायचे. आता तक्ष त्यांचीही वयं 60 च्या वर झालेले आहेत.
सरांचा लिहिण्यामध्ये जसा हातखंडा होता तसाच भाषणांमध्ये आणि संचालनामध्ये .कवीश्रेष्ठ सुरेश भटांच्या बऱ्याच कार्यक्रमाचे संचालन त्यांनी केले आहे. सुरेश भटांचे ते चांगले मित्र होते.
सहा अक्षरांवर सरांचे खूप प्रेम होते. त्यांच्या सगळ्या पुस्तकांची नावे सहा अक्षरी आहेत. आखर आंगण चेहरे मोहरे दिंडी गेली पुढे आसवांचा ठेवा पुनवेचा थेंब झोपलेले गाव ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
सोलापूर जिल्ह्यात बार्शीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होते. गं .बा. सरदार हे अध्यक्ष होते. पन्नालाल सुराणा हे स्वागताध्यक्ष होते. बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये हे साहित्य संमेलन होणार होते. तेव्हा गृहमंत्री असलेले श्री भाई वैद्य हे रंगमंचावर न बसता रसिकांमध्ये बसले होते हे या संमेलनाचे वैशिष्ट्य. मला व बबन सराडकर यांना या संमेलनाला जायची इच्छा होती. बबनची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होते. बार्शीला जायचे म्हणजे मजजवळ पैसे नव्हते. जेमतेम 210 रुपये पगार होता. मी सरांजवळ गोष्ट काढली. सरांनी संमेलनासाठी मला उसने पैसे दिले. त्यामुळे माझे बार्शीचे साहित्य संमेलन होऊन गेले. राहण्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी एका दैनिकाचे प्रतिनिधी असल्याचे प्रमाणपत्र घेतले. त्यामुळे राहण्याचा व जेवणाचा प्रश्न मिटला. केचेसर सोबत असल्यामुळे खूप ओळखी पाळखी झाल्या. सरांचा मुलगा सतेज तो पण आमच्याबरोबर संमेलनाला आला होता.
1976 साली आम्ही साहित्य संगम नावाची साहित्यिक संस्था काढली. झेप हा प्रातिनिधिक कवितासंग्रह काढला. प्रा. मधुकर केचे यांनी त्याला 16 पाण्याची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली. साहित्य संगमचे उद्घाटन 26 जानेवारी 1976 रोजी अमरावतीच्या नगर वाचनालयात झाले. मधुकर केचे प्रभा गणोरकर कवी अनिल शरदचंद्र सिन्हा बाबा मोहोड प्रकाश चौधरी उषाताई चौधरी भाऊ मांडवकर सुभाष सावरकर अशी त्या काळातील नामवंत मंडळी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर मला नेहमी म्हणायचे तू चळवळीपेक्षा भाषण दे. वक्ता म्हणून तुझा नावलौकिक झाला पाहिजे. चळवळीमध्ये लोक तुला वापरून घेत आहेत. पण मला ते पटेना. आज मात्र मी वक्ता म्हणून संपूर्ण भारतात जेव्हा फिरतो तेव्हा केचेसरांनी मला त्याचे बाळकडू मी महाविद्यालयात असतानाच दिले होते याचे जाणीव होते.
डॉ. मोतीलाल राठी व प्रा. मधुकर केचे यांच्या पुढाकारामुळे व प्रेमामुळे श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयात मराठी कवी संमेलन सुरू झाले. अगोदर फक्त हिंदी कवी संमेलन व्हायचे. पण डॉ. मोतीलाल राठी व केचे सर यांनी मराठी कवी संमेलन श्री गणेशदास राठी छात्रालय समिती द्वारा संचालित श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयामध्ये सुरू करून एक नवीन पायंडा पाडला.
सरांना कॅन्सर झाला होता. सरांचा निरोप आला. मी व बबन सराडकर सरांच्या घरी गेलो. सर मला व बबनला म्हणाले. तुम्ही तुमच्या बॅगा भरून तयार राहा. केव्हाही तुम्हाला माझ्याबरोबर मुंबईला चालावे लागेल. मी म्हटल्याबरोबर नरेश आणि बबन मुंबईला येथील असा त्यांना विश्वास होता आणि तो खराही होता. सर मुंबईला गेले. उपचार घेऊन परत आले.
एक दिवस माझ्या तपोवनच्या घरी केचे सरांच्या घराच्या समोर राहणारे अभियंता श्री अरुण बद्रे सकाळी सकाळी माझ्याकडे आले आणि केचेसर यांच्या दुःखद निधन झाल्याची कल्पना त्यांनी मला दिली. तेव्हा मोबाईलचा दूर साधा लँडलाईनही सरांकडे किंवा माझ्याकडे नव्हता. मी लगेच बबन सराडकरकडे गेलो आणि त्यांना घेऊन त्याच्या सरांचे घर गाठले. खूप लोक अंतयात्रेला आले होते.
दुसऱ्या दिवशी आम्ही अमरावतीच्या राजापेठ भागातील भारतीय विद्यालयात सरांना साहित्य संगमतर्फे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता.
सर आज आमच्यात नाहीत. पण सरांनी आमच्या ठिकाणी जे साहित्याचे बीजारोपण केले त्याला आता चांगले अंकुर फुटले आहेत .नव्हे ते साहित्याचे झाड आता बहरले आहे. मधुकर केचे सर कदाचित माझ्या जीवनात आले नसते तर माझ्या लेखनाला आणि माझ्या भाषणाला आज जो वेग आला आहे तो यायला कदाचित विलंब लागला असता.
सरांनी जे लिहिले ते प्रामाणिकपणे लिहिले.
मी सरांना नेहमी म्हणायचा सर तुम्ही स्वतःचे आत्मचरित्र लिहा. त्यांना डायरी लिहिण्याची सवय होती. ते मला सांगायचे मला जे जे लिहायचे आहे तेथे मी डायरीमध्ये लिहीत आहे. आणि मी जे लिहितो ते माझ्या जीवनातील अनुभवावरच लिहितो त्यामुळे वेगळे काही आत्मचरित्र लिहावे असे मला वाटत नाही.
सर वारल्यानंतर त्यांची गाजलेली व पुरस्कार प्राप्त पुस्तके यांचे पुनर्मुद्रण करावे असे मी सौ. मुक्ता वहिनींना सुचवले. पण तेव्हाचे मराठीमधील एक मोठे लेखक व वक्ते यांनी ही जबाबदारी स्वीकारली .त्यामुळे मी माझा प्रस्ताव मागे घेतला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या ध्येयधोरणाला जपणारा हा माणूस कमी वयामध्ये आमच्यातून निघून गेला. आज त्यांचा जयंतीचा दिवस त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
सचिव
साहित्य संगम अमरावती
9890967003
