You are currently viewing जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज

 सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

 सिंधुदुर्गनगरी

 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले आहेत.

या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून महसूल व पोलिस विभागांमध्ये प्रभावी समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असेही जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन होईल याकडे सर्व संबंधितांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व पोलिस प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, श्रीमती आरती देसाई, उप मुख्य कार्यकारी शितल पुंड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, विविध नोडल अधिकारी तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, निवडणूक कालावधीत महसूल, पोलिस तसेच इतर संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करणे अत्यावश्यक आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मतदान केंद्रांवर कोणताही गोंधळ निर्माण होणार नाही, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींवर तात्काळ दखल घेऊन त्यांचे त्वरित निराकरण करावे आणि आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पूर्ण पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी सांगितले की, निवडणुकांच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणांनी सतर्क राहावे. चेकपोस्टवर तैनात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक दक्षतेने काम करावे. तसेच दुर्गम व संवेदनशील भागातील मतदान केंद्रांवर महसूल व पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा