“विकासाचा एकच छंद : आनंद…!” या घोषणेसह आनंद तळणकरांची उमेदवारी जाहीर, राजकीय हालचालींना वेग
दोडामार्ग :
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माटणे जि.प. मतदारसंघात राजकीय वातावरण तापू लागले आहे. “विकासाचा एकच छंद : आनंद…!” हा प्रभावी नारा देत आनंद तळणकर यांनी आपली इच्छुकता जाहीर करत निवडणूक रणशिंग फुंकले आहे. ते भारतीय जनता पक्ष दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष असून झरेबांबर गावचे स्थानिक सुपुत्र आहेत.
स्थानिक, सक्षम आणि विकासाभिमुख नेतृत्वाची गरज अधोरेखित करत तळणकर म्हणाले की, अनेक वर्षांच्या संघटनात्मक कामकाजातून मतदारसंघातील प्रत्येक प्रश्नाशी आपली थेट नाळ जोडली आहे. मागील निवडणुकीतील निसटता पराभव हा अनुभव यावेळी ताकदीत रूपांतरित झाला असून, मतदारसंघात भक्कम संघटनात्मक बांधणी उभी राहिल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“विकास हवा असेल तर बदल हवा,” अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही दिली. स्थानिक उमेदवारालाच परिसराच्या प्रश्नांची अचूक जाण असून सातत्यपूर्ण पाठपुराव्याची ताकद असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
आनंद तळणकर यांच्या मैदानात उतरण्याने माटणे जि.प. मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून, “विकासाचा एकच छंद : आनंद विजयी होणार” या घोषणेने निवडणूक रंगतदार होत आहे.
