You are currently viewing ‘ऊर्जा’ : सावली, सारथी आणि मायेच्या आशीर्वादातून उजळलेले एक भविष्य

‘ऊर्जा’ : सावली, सारथी आणि मायेच्या आशीर्वादातून उजळलेले एक भविष्य

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते निराधार बालिकेचा ऐतिहासिक नामकरण सोहळा

सिंधुदुर्गनगरी :

कधी कधी प्रशासन केवळ नियम–कायद्यांच्या चौकटीत न राहता माणुसकीचे जिवंत रूप धारण करते… आणि अशाच एका संवेदनशील क्षणाची साक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्याने अनुभवली. सावंतवाडी येथील शासकीय अंकुर महिला वसतिगृहात एका निराधार नवजात बालिकेला केवळ निवारा नव्हे, तर नाव, ओळख आणि उज्ज्वल भवितव्याची आशा मिळाली. मकर संक्रांतीच्या शुभ दिनी, १४ जानेवारी २०२६ रोजी, या चिमुकल्या जीवाचे नामकरण झाले — ‘ऊर्जा’.

हा सोहळा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे, शासकीय अंकुर महिला वसतिगृहाच्या सुमारे ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच असा नामकरण सोहळा आयोजित करण्यात आला आणि स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी बालिकेला नाव दिले. ‘ऊर्जा’ हे नाव जणू संघर्षावर मात करणाऱ्या जीवनशक्तीचे, अंधारातून प्रकाशाकडे नेणाऱ्या आशेचे प्रतीक ठरले.

या प्रसंगी जिल्हाधिकारी धोडमिसे भावूक झाल्या. त्या म्हणाल्या, “समाजातील रंजले–गांजले घटकांच्या चेहऱ्यावर हसू उमटवता आले, तर तेच आपल्या कामाचे खरे समाधान असते. अशा क्षणांतूनच पुढील कामासाठी नवी ऊर्जा मिळते.” महिला व बाल विकास विभाग व अधिनस्त यंत्रणांचे कार्य त्यांनी विशेष कौतुकास्पद असल्याचे नमूद करत, बालिकेचे आयुष्य नावाप्रमाणेच ऊर्जामय व प्रकाशमय व्हावे, अशा मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यामागे दडलेली कथा तितकीच हृदयस्पर्शी आहे. गर्भावस्थेत पतीकडून वाऱ्यावर सोडलेली पीडित महिला, कोणताही आधार नसताना ‘सखी वन स्टॉप सेंटर, सिंधुदुर्ग’ येथे दाखल झाली. तिची परिस्थिती लक्षात घेऊन तिला २४ सप्टेंबर २०२५ रोजी अंकुर महिला वसतिगृहात दाखल करण्यात आले. येथे तिला निवासाबरोबरच मायेची ऊब, वैद्यकीय सेवा आणि सुरक्षिततेचा आधार मिळाला. अखेर २३ डिसेंबर २०२५ रोजी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तिने कन्यारत्नाला जन्म दिला.

ही आनंदवार्ता जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवताच, ‘मुलीच्या जन्माचे स्वागत’ उपक्रमांतर्गत बालिकेचा नामकरण सोहळा संस्थेतच करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सर्व नियोजन करून हा सोहळा साकार झाला.

नामकरणावेळी बालिकेची माता अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भारावून गेली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः नाव ठेवल्याचा क्षण तिच्यासाठी आयुष्यभराचा ठेवा ठरला. यावेळी संस्थेतील महिलांनी ‘ऊर्जा’साठी पाळणा गीत गायले आणि संपूर्ण परिसर मायेच्या सुरांनी न्हाऊन निघाला.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांसोबत, बापू शिणगारे – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पूजा इंगावले – कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी, माधुरी मुळीक – पोलीस निरीक्षक, सावंतवाडी, भिकाजी काटकर – जिल्हा परिविक्षा अधिकारी, लक्ष्मी जांभोरे – प्रभारी अधिक्षिका, श्रीनिधी देशपांडे – विधी सल्लागार, राजगोविंद मडावी – जिल्हा संरक्षण अधिकारी, पुरुषोत्तम पाटील – संरक्षण अधिकारी, माया रहाटे – सदस्या, बाल कल्याण समिती, कृतिका कुबल – सदस्या, बाल न्याय मंडळ, सिकंदर आढाव – कनिष्ठ लिपिक, ऐश्वर्या कल्याणी – अधिपरिचारिका, रूपाली प्रभु – केंद्र प्रशासक, सखी वन स्टॉप सेंटर OSC, मिनाश्री नाईक – केस वर्कर, अर्पिता वाटवे – महिला समुपदेशन केंद्र तसेच महिला व बाल विकास विभागाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी नूतन बालिकेस शुभाशीर्वाद दिले.

‘ऊर्जा’ नावाच्या त्या चिमुकल्या जीवासोबतच समाजातही आशा, विश्वास आणि मायेची नवी ऊर्जा निर्माण झाली. हा सोहळा केवळ एका बालिकेच्या नावापुरता मर्यादित नव्हता तर तो करुणा, संवेदनशीलता आणि प्रशासनातील माणुसकीचा उत्सव होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा