You are currently viewing शब्द–संवेदनांचा उत्सव : मराठी साहित्य व कला सेवेतर्फे तेवीसावे कविसंमेलन दादरमध्ये उत्साहात संपन्न

शब्द–संवेदनांचा उत्सव : मराठी साहित्य व कला सेवेतर्फे तेवीसावे कविसंमेलन दादरमध्ये उत्साहात संपन्न

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

शब्दांना भावार्थ देणाऱ्या संवेदना, अनुभवांना दिशा देणारे विचार आणि संस्कृतीच्या मुळांशी जोडणारी अभिव्यक्ती यांचा सुरेल संगम साधणारे मराठी साहित्य व कला सेवा आयोजित तेवीसावे कविसंमेलन रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी दादर (पूर्व) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी येथे अत्यंत शिस्तबद्ध, रसिक आणि साहित्यनिष्ठ वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. नववर्षाच्या प्रारंभी आयोजित या साहित्यिक सोहळ्याने कवी आणि रसिकांच्या मनात सर्जनशील ऊर्जेचे नवे अंकुर रुजवले.

गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने काव्य, कला आणि विचारांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या मराठी साहित्य व कला सेवा या संस्थेने या संमेलनातून नवोदित व अनुभवी कवींना समान व्यासपीठ उपलब्ध करून दिले. एकाच कार्यक्रमात प्रत्येक कवीला तीन कविता सादर करण्याची संधी देणारी ही संस्था अखंड भारतवर्षातील एकमेव संस्था असल्याचे वैशिष्ट्य या संमेलनात अधोरेखित झाले. “कविता का लिहावी?” या पहिल्या सत्रात आत्मशोध, समाजाशी साधलेला प्रामाणिक संवाद आणि न बोलता येणाऱ्या भावनांचा काव्यमय वेध घेण्यात आला, तर दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात मुक्त विषयांवरील स्वच्छंद, प्रामाणिक आणि भावपूर्ण अभिव्यक्तीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कविसंमेलनात अशोक सहदेव सुकाळे, आदित्य भालचंद्र कुलकर्णी, एकनाथ शेडगे, कल्पना दिलीप मापूसकर, चंद्रकांत दढेकर (अभिवाचन), जयश्री हेमचंद्र चुरी, नमिता नितीन आफळे (अभिवाचन), प्रतिक्षा पांडुरंग सरमळकर, महेश रामनाथ वैजापूरकर, डॉ. मानसी पाटील, मोहित जनार्दन तांडेल, योगिता दशरथ कदम, विक्रांत मारुती लाळे, विलास मारुती अडसुळे (अभिवाचन), विवेक वसंत जोशी आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या सादरीकरणातून विविध भावविश्वे उलगडली. स्वामी विवेकानंद या विषयांवरील अभिवाचनाने विचार, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा सशक्त संदेश दिला.

कार्यक्रमाचे आस्वादक म्हणून डॉ. अनुज केसरकर आणि राहुल मुदाळकर यांनी सूक्ष्म निरीक्षणांसह रचनांचा रसग्रहणात्मक आढावा घेतला. सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. मानसी पाटील यांनी अत्यंत ओघवत्या आणि संवेदनशील शैलीत पार पाडली. अल्पोपहाराची शानदार व्यवस्था डॉ. मानसी पाटील आणि डॉ. अनुज केसरकर यांनी केली. कार्यक्रमाचे छायाचित्रण विक्रांत लाळे यांनी व्यावसायिक खुबीने केले. संपूर्ण कार्यक्रमात साहित्यिक शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे विशेष लक्षवेधी ठरले.

शब्दसंपदा, वैचारिक समृद्धी आणि सांस्कृतिक जाणीव यांचा सुरेल संगम साधणारे हे तेवीसावे कविसंमेलन उपस्थित प्रत्येकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा अनुभव ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी समारोपप्रसंगी आयोजकांनी पुढील उपक्रमाची घोषणा करत चोवीसावे कविसंमेलन रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. साहित्यसंवादाचा हा सन्माननीय मंच भविष्यातही मराठी साहित्यविश्वाला नवी दिशा देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा