You are currently viewing नियती रडते आहे
Oplus_16908288

नियती रडते आहे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम मुक्तछंद काव्यरचना*

 

*नियती रडते आहे*

 

हिरव्या गर्भावर ओरखडे ओढताना

मानवा तुला कसं कळलं नाही?

ज्या हाताने सृष्टी सजवायची होती,

त्याच हातांनी तू तिचा श्वास कोंडला आहेस

आज ही नियती शांत नाही ती रडते आहे

 

काळयाकुठं धुराच्या लोटात

तिचं निळा आकाश हरवून गेलंय

कधीकाळी पक्षांच्या किलबिलाटाने जाग येणारी पहाट

आता कारखान्यांच्या चित्काराने शहारते आहे

पाहून हे सारे नियती कोपऱ्यात बसून रडते आहे

 

नद्यांचे वाहते पाणी तू अडवलस

त्यात विष कालवून त्याचं रक्त केलं

तहानलेल्या पृथ्वीच्या ओठावर मात्र

तू सिमेंटची कोरडी पापुद्र ओढली आहेस

तहानलेली नियती आज अश्रुनी स्वतःला भिजवते आहे

 

डोंगर पोखरून तू तुझे किल्ले उभे केले

पण विसरलास की पायातल्या मातीचा आधार तूच काढला आहेस

जंगलातल्या पाखरांचा निवारा हिरावून घेताना तू स्वतःच्या विनाशाची पायाभरणी केली आहेस

उध्वस्त घरटी बघून नियती मूकपणे रडते आहे

 

समुद्राच्या लाटा आता गाणी गात नाही

त्याच्या गर्जनेत एक आर्त भीती लपलेली आहे

प्लास्टिकच्या विळख्यात अडकलेला तो विशालकाय जलाधी

आज मानवाच्या प्रगतीला शाप देऊ पाहतोय

असाय वेदनेने नियती आज रडते आहे

 

वाऱ्याच्या झुळकीत ,पावसाच्या थेंबात, मातीच्या वासात

तिची आर्त हाक ऐकण्याचा प्रयत्न कर

नाहीतर हा अश्रूंचा पूर तुलाही वाहून नेईल

तुझ्या या अज्ञानावर नियती आज घाय मोकळून रडते आहे….

 

सौ स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

प्रतिक्रिया व्यक्त करा