उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते; भजनी कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ, २५ नामांकित मंडळांचा सहभाग
कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने भव्य ‘पालकमंत्री चषक भजन स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत ‘पुष्प तिसरे’ म्हणजेच कणकवली तालुकास्तरीय भजन स्पर्धा येत्या शनिवार, दि. १० जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्रथमच अशा स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन करून भजनी कलाकारांना प्रोत्साहन दिले जात आहे. या स्पर्धेसाठी चुरस निर्माण झाली असून तालुक्यातील २५ नामांकित भजनी मंडळांनी यात सहभाग घेतला आहे. विजेत्या संघांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांक : १०,०२३/- रुपये व आकर्षक चषक,
द्वितीय क्रमांक : ५,०२३/- रुपये व आकर्षक चषक,
तृतीय क्रमांक : ३,०२३/- रुपये व आकर्षक चषक,
चतुर्थ क्रमांक : २,०२३/- रुपये व आकर्षक चषक.
सांघिक यशासोबतच वैयक्तिक कौशल्याला दाद देण्यासाठी उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट तबला आणि उत्कृष्ट कोरस या श्रेणींमध्ये प्रत्येकी १,०२३/- रुपये रोख स्वरूपात बक्षीस दिले जाणार आहे.
शनिवारी १० जानेवारी रोजी भगवती मंगल कार्यालय, कणकवली येथे या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्गचे अध्यक्ष संतोष कानडे व सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या भजन स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्यउद्योग तथा बंदरे विकास मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. कणकवली तालुक्यातील भजनप्रेमी व रसिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली शहरातच ही स्पर्धा होत असल्याने आयोजकांनी जोरदार तयारी केली आहे.
भजनी कलाकार संस्था, सिंधुदुर्ग यांनी यापूर्वी कुडाळ येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा घेतली होती. ती भजन स्पर्धा यशस्वी झाली होती. त्यानंतर पालकमंत्री चषक भजन स्पर्धा जिल्हा भरात सुरू झाली. देवगड तालुक्यातील भजनी मंडळांची पहिली तालुकास्तरीय स्पर्धा कुणकेश्वर येथे पार पडली. या स्पर्धेला भजनी मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर वैभववाडी येथे तालुकास्तरीय भजन स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. त्यानंतर आता कणकवली येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही देखील स्पर्धा यशस्वी होईल, असा विश्वास भजनी बुवा संतोष कानडे यांनी व्यक्त केला आहे.
