You are currently viewing उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील विद्यार्थ्यांनी फुलविला विविध भाज्यांचा मळा

उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील विद्यार्थ्यांनी फुलविला विविध भाज्यांचा मळा

 

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भाज्यांचे महत्व आपण जाणतोच. सध्या मुळदे परिसरात *भाजी घ्या भाजी ..….ताजी ताजी भाजी* हे सूर विद्यार्थी विद्यार्थिनीकडून ऐकू येत आहेत. अभ्यासक्रमाचा एक विषय म्हणून उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील प्रक्षेत्रावर चतुर्थ वर्षातील पदवीच्या विद्यार्थ्यांनी उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विविध भाज्यांचे फुलविलेले मळे सध्या परिसरात आकर्षण ठरले आहेत.

 

यामध्ये १० विद्यार्थ्यांचा एक गट याप्रमाणे ९ गटांनी मिळून विविध भाज्यांचे मळे फुलविले आहेत.

लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व व्यवस्थापन या विद्यार्थ्यांमार्फत पाहिले जाते. केवळ पुस्तकी ज्ञान न घेता प्रत्यक्ष प्रत्यक्षिकांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना भाजी लागवडीमधील बारकावे अभ्यासता येत आहेत.

यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, मिरची, वांगी,भेंडी, वाल, लाल माठ, पालक,मुळा, मेथी, कोथिंबीर, गवार, तोंडली,घेवडा इत्यादी भाज्या व मक्या चा समावेश आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रात्यक्षिकातून शिक्षण पद्धती चा वापर केलेला दिसून येतो.

सदर भाजीपाला पिकविणारे विद्यार्थी प्रामाणिकपणे भाजीपाला व्यवस्थापन व विक्री करताना दिसत आहेत. केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून नव्हे तर या युवक युवतींकडून केवळ आणि केवळ चांगल्या पद्धतीने भाजी पिकवतानाची मेहनत दिसून येत आहे.

तयार झालेल्या भाज्या योग्य पद्धतीने काढणी करून विक्री ची कला देखील या विद्यार्थ्यांनी अवगत केली आहे.

आपली भाजी कशी चांगली हे पटवून देण्याची कला या विद्यार्थ्यांमध्ये प्रामुख्याने दिसते.

मराठमोळ्या शेतकऱ्यांची मुले व देशाचे भावी आधारस्तंभ अशी ही मुले प्रत्यक्ष शेतात काम करताना एक वेगळा संदेश समाजाला देऊ इच्छितात. या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे व उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे कौतुक करायलाच हवे.

कारण केवळ फोटो पुरते उपक्रम राबवून प्रसिद्धीच्या मागे लागण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर भर देऊन भविष्यातील शेतीमध्ये तरुणांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महाविद्यालय प्रयत्नशील आहे. या अभिनव उपक्रमातून खऱ्या अर्थाने गरजेच्या शिक्षणपद्धतीचा वापर केला जातोय हे तितकेच महत्वाचे आहे.

सदर उपक्रम उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे चे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रदीप हळदवणेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली इतर सर्व प्राध्यापक वर्ग व प्रक्षेत्र कर्मचारी यांच्या सहकार्याने राबविला जात आहे…..

*लेखन व प्रसिद्धी : डॉ.संदीप गुरव*

प्रतिक्रिया व्यक्त करा