You are currently viewing माझे लाहोटी महाविद्यालय

माझे लाहोटी महाविद्यालय

अमरावतीच्या श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचा अमृत महोत्सव संपन्न होत आहे त्यानिमित्त

 

माझे लाहोटी महाविद्यालय 

 

अमरावतीची श्री गणेशदास राठी छात्रालय समिती ही महाराष्ट्रातील एक नामवंत शिक्षण संस्था आहे. सुमारे 75 वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली. आज या संस्थेची महाविद्यालयं विद्यालयं प्राथमिक शाळा छात्रालय कनिष्ठ महाविद्यालये अशा विविध शाखांमध्ये प्रगती झालेली आहे.

 

तीन दिवस चालणाल्या या अमृत महोत्सवाला राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज लोक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिनांक 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष श्री ओमजी बिर्ला तसेच अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष पूज्य श्री गोविंददेव गिरीजी महाराज हे उपस्थित राहून या अमृत महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत.

 

श्री गणेशदास राठी छात्रालय समितीमध्ये मी वीस वर्ष घालविले आहेत. सुरुवातीला विद्यार्थी मग कर्मचारी व मग प्राध्यापक अशी तिहेरी भूमिका माझी राहिलेली आहे. विशेष म्हणजे या छात्रालय समितीच्या मेसमध्ये मी प्रदीर्घकाळ राहिलेलो आहे. श्री गणेशदास राठी छात्रालय समितीने जेव्हा राज महाविद्यालय स्थापन करायचे ठरविले तेव्हा त्यांनी छात्रालयाची इमारत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला हस्तांतरित केली आणि छात्रालयाच्या इमारतीत सुरू झाले ते राज महाविद्यालय म्हणजे आताचे श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय. या महाविद्यालयामध्ये अगदी सुरुवातीला माझे वडील चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून नियुक्त झाले आणि त्यांना वस्तीगृहाची खाली झालेली स्वयंपाकाची खोली म्हणजे मेस राहण्यासाठी देण्यात आली. स्वयंपाकघर मोठेच होते म्हणजे हॉल एवढे होते. त्या हॉलमध्ये माझे वडील माझी आई माझे 2 भाऊ माझ्या 2 बहिणी लहानाचे मोठे झालो .

 

छात्रालयाच्या परिसरातच श्री गणेशदास राठी विद्यालय होते. तेथे आमचे सर्वांचे शालेय व माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर बाजूलाच असलेल्या राज महाविद्यालयामध्ये मी प्रवेश घेतला. या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे या महाविद्यालयामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक मधुकर केचे व ज्यांनी महात्मा गांधी वाङ्मयाचे मराठीमध्ये भाषांतर केले ते प्राध्यापक ब्रिजमोहन हेडा हे मराठी शिकवायला होते. त्याचबरोबर इंग्रजीचे प्राध्यापक एस एस जोशी हे अतिशय तल्लख बुद्धीचे प्राध्यापक याच महाविद्यालयामध्ये होते.

 

माझे व्यक्तिमत्व घडवविण्यामध्ये या श्री गणेशदास छात्रालय समितीचा फार मोठा वाटा आहे. समितीच्या ज्या महाविद्यालयात मी शिकलो त्या महाविद्यालयाचे नाव आता श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय असे आहे. धनज येथील लाहोटी परिवाराने 1972 -73 या वर्षांमध्ये एक लाखाची उदार देणगी दिल्यामुळे या महाविद्यालयाचे नाव राज महाविद्यालयावरून श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय असे करण्यात आले. या महाविद्यालयामध्ये चार वर्ष शिकण्याचा मला योग आला.

 

मला तेव्हा मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला सहज प्रवेश मिळू शकला असता इतकी चांगली टक्केवारी माझी होती. पण मला आवड होती ती साहित्याची .मला मराठीचेच प्राध्यापक व्हायचे होते. त्यामुळे मी चक्क कला शाखा निवडली. कला शाखेमध्ये दिग्गज प्राध्यापक शिकवायला आल्यामुळे माझी प्रगती ही वेगाने झाली.

 

या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य असे की या महाविद्यालयामध्ये विविध सांस्कृतिक सामाजिक साहित्यिक उपक्रम सातत्याने राबविले जायचे .इथले दरवर्षी संपन्न होणारे हिंदी कवी संमेलन व मराठी कवी संमेलन संपूर्ण पंचक्रोशीमध्ये गाजत होते. तत्कालीन सुप्रसिद्ध हिंदी कवी या महाविद्यालयामध्ये हजेरी लावून गेलेले आहेत. त्याचबरोबर मराठी कवींमध्ये सर्वश्री सुरेश भट प्राध्यापक वसंत बापट मंगेश पाडगावकर विंदा करंदीकर प्राध्यापक देविदास सोटे प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल वाघ सारखे मान्यवर कवी या महाविद्यालयामध्ये आलेले आहेत.

 

माझी पदवी परीक्षा झाल्यानंतर मी शासकीय विदर्भ महाविद्यालयामध्ये एम ए मराठी करण्यासाठी जुलै 1974 मध्ये प्रवेश घेतला. एक ऑक्टोबर 1974 ला लाहोटी महाविद्यालयामध्ये चतुर्थ श्रेणी असलेले माझे वडील श्री विठ्ठलराव काठोळे यांचे आकस्मिक निधन झाले. समितीने मला सात दिवसांमध्ये त्यांच्या जागेवर नेमले. त्यामुळे आमच्या कुटुंबाला फार मोठा आर्थिक आधार मिळाला. बाबा चपराशी म्हणून काम करीत होते. मला देखील तेच काम करावे लागत होते .पण काम करण्यासाठी मला लाज वाटत नव्हती .कारण मी शालेय जीवन जगत असताना ब्रेड विकणे आंबे विकणे, संत्री विकणे शेतावर कामाला जाणे गवंडी कामाला जाणे ही कामे केलेली होती. त्यामानाने चपराशी हे पद चांगले पगार देणारे व कमी कष्टाचे होते.

 

श्री गणेशदास राठी छात्रालय समितीच्या लाहोटी महाविद्यालयामध्ये शिकत असताना व नोकरी करीत असताना येथल्या समृद्ध ग्रंथालयाचा मी पुरेपूर उपयोग घेतला. अतिशय गाजलेले व हमीद दलवाईचा वारसा खऱ्या अर्थाने चालविणारे मुस्लिम सत्यशोधक समाजाचे नेते श्री शेख वजीर पटेल हे ग्रंथपाल होते. ते फार मोठे समाज सुधारक होते. त्यांच्यावर तलवारीने हल्ला देखील झाला होता .पण त्यांनी आपला समाजसेवेचा पिंड मरेपर्यंत सोडला नाही. महाराष्ट्र शासनाने त्यांना त्या काळात बॉडीगार्ड दिला होता. त्यांचे माझ्यावर प्रेम होते .त्यामुळे मला ग्रंथालयातील भरपूर पुस्तके वाचण्याचा योग आला. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी ग्रंथालयात बसलेला असे.

 

मी मराठीत एम एस झालो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात मराठी विषयात पहिला आलो. आणि ज्या महाविद्यालयात मी विद्यार्थी होतो चपराशी होतो त्याच महाविद्यालयामध्ये मी मराठीचा प्राध्यापक म्हणून लागलो. त्यासाठी तत्कालीन अध्यक्ष श्री शंकरलालजी राठी व कार्यकारिणी सदस्य व सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. मोतीलाल राठी यांनी मनापासून मला मदत केली.

 

छात्रालय समितीच्या लाहोटी महाविद्यालयामध्ये माझ्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत गेला. महाविद्यालयामध्ये बुक बँक असल्यामुळे व माझी परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मला पुस्तके बुक बँकमधून मिळत होती. याशिवाय राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना या उपक्रमात मला भाग घेता आला. त्यांच्यामार्फत विविध कॅम्प मी केले .त्यामुळे आपोआपच व्यक्तिमत्व विकसित होण्यावर भर पडला.

 

महाविद्यालयात आम्हाला मराठी शिकवायला प्रा. मधुकर केचे हे होते. त्यांच्या लेखनिक म्हणून मी बरेच वर्ष काम केले. सरांचे लेखन हे एक टाकी होते. त्यामुळे माझे मराठीचे शुद्धलेखन तसेच मराठीचे लेखनही चांगले झाले. याच महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे प्रा.एस एस जोशी हे मला सतत प्रोत्साहन द्यायचे. ते मला इंग्रजी शिकवित नव्हते तरी पण माझ्यावर लक्ष ठेवून होते.

 

या महाविद्यालयात शिकत असताना व नोकरी करीत असताना मला आलेले अनुभव या अमृत महोत्सवानिमित्त व्यक्त करता आले हा मोठा योगायोग आहे. मी या छात्रालय समितीमध्ये वीस वर्षे काम केले. पण ते प्रामाणिकपणे केले. जेवणाची चिंता न करता केले. त्यामुळे या महाविद्यालयाने मला बरेच प्राध्यापक मित्र दिले. तसेच बरेच विद्यार्थी मित्र दिले. रक्तदान चळवळीत संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेला महेंद्र भुतडा मला याच महाविद्यालयात भेटला. दहा लाख किलोमीटरचा खडतर प्रवास गाडीने करणारा विनोद जोशी भेटला तो याच महाविद्यालयात. अजूनही आपली मैत्री कायम ठेवणारा सुभाष चराटे याची भेट याच महाविद्यालयातील. माझ्या प्रमोशनसाठी छात्रालय समितीच्या सचिवांकडे म्हणजे श्री सत्यनारायणजी लढ्ढा यांच्याकडे वडिलांमार्फत शब्द टाकणारा व प्रमोशन करून देणारा माझा जिवलग मित्र मुरलीधर घाटोड तो गवसला तो याच महाविद्यालयात. या महाविद्यालयाने कितीतरी मित्र मला दिले .ते आजही माझ्या सोबत आहेत आणि राहतीलही.

 

श्री गणेशदास राठी छात्रालय समितीमध्ये मी काम करीत असताना कार्यकारिणीचे अनेक सदस्य तसेच अध्यक्ष यांचे माझे जिवाभावाचे संबंध होते .मी जरी चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलो तरी कार्यकारिणीचे अध्यक्ष व उर्वरित सदस्य हे माझ्या निकटतम होते.

त्यातील डॉ. मोतीलाल राठी तर हे माझे गॉडफादारच होते. त्यांच्या पुढाकाराने आम्ही साहित्य संगम नावाची संस्था 1976 मध्ये स्थापन केली. आमच्या संस्थेचे सर्व कार्यक्रम तेव्हा श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयमध्येच व्हायचे. हॉलचा खर्च नाही. लाऊड स्पीकरचा खर्च नाही .पाण्याचा खर्च नाही. विजेचा खर्च नाही .ते सगळे सोसलेले ते केशरबाई लाहोटी महाविद्यालयानेच.

 

मी तेव्हा अमरावतीच्या नवीन कॉटन मार्केटच्या झोपडपट्टीत राहत होतो. घरात वीज नव्हती. संडास बाथरूमपण नव्हते. मी प्राचार्यांसमोर रात्री अभ्यासाला मी कॉलेजमध्ये येत जाईल असा प्रस्ताव मांडला. तेव्हा प्राचार्य रामनिवास मुंदडा होते. त्यांनी तो तात्काळ मंजूर केला. आजच्यासारखे सुरक्षारक्षक त्या काळात नव्हते. महाविद्यालय मोकळेच असायचे. फक्त दारांना कुलपं लागायची. मी महाविद्यालयात रात्रीचा अभ्यास करायला येऊ लागलो. त्यामुळे माझ्या अभ्यासाला गती आली आणि मला मेरीटमध्ये आणण्यात या महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे.

 

वर्षभराभर निघून जातात. मी सेवानिवृत्त होऊ नये ही 15 वर्षे झालेली आहेत. श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ.विजय भांगडिया मला वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावितात. आज मला घडविणाऱ्या या समितीचा अमृतमहोत्सव. त्यानिमित्त शुभेच्छा.

 

प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे

माजी विद्यार्थी व प्राध्यापक

श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती.

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा