You are currently viewing लसीच्या दोन मात्रा पूर्ण नसणाऱ्या, 72 तासापूर्वीचा आरटीपीसीआर अहवाल नसणाऱ्या प्रवाशांची ॲन्टीजेन

लसीच्या दोन मात्रा पूर्ण नसणाऱ्या, 72 तासापूर्वीचा आरटीपीसीआर अहवाल नसणाऱ्या प्रवाशांची ॲन्टीजेन

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या गणेशोत्सवाबाबत मार्गदर्शन सूचना

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्याबाहेरून प्रवेश करण्‍याकरिता कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा पूर्ण असाव्‍यात. मात्र, ज्या नागरिकांच्या कोव्हीड लसीच्या दोन मात्रा पूर्ण झालेल्या नाहीत, अशा नागरिकांना जिल्ह्यात प्रवेशापूर्वी 72 तास पूर्वीचा RTPCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. ज्‍या प्रवाशांकडे कोरोना लसीच्‍या दोन मात्रा पूर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा RTPCR चाचणीचा अहवाल नसल्‍यास, अशा प्रवाशांची मोफत Rapid Antigen Test (RAT) तपासणी केली जाईल. 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांचे प्रवेशास RTPCR चाचणी अहवाल आवश्यक नाही, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज दिल्या.

कार्यान्वयन यंत्रणांसाठी मार्गदर्शक सूचना :-

Ø  जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची महसूल, आरोग्य व पोलीस पथकामार्फत जिल्ह्यात प्रवेशाच्या ठिकाणी चेक पोस्टवर, रेल्वे स्टेशन व बस स्‍थानकावर नोंदणी करण्यात यावी.

Ø  मुंबई, पुणे किंवा जिल्हयाबाहेरुन एस.टी. बसमधून येणाऱ्या प्रवाशांची माहिती, बस ज्या ठिकाणाहून सुटेल त्याच ठिकाणी विहीत नमुन्यामध्ये दोन प्रतीत भरावी. त्याची एक प्रत जिल्ह्यात प्रवेशाच्या ठिकाणी चेक पोस्टवर जमा करून घ्यावी.

Ø  सदर माहितीची दुसरी प्रत वाहनचालक यांनी तालुक्याच्या एसटी डपोमध्ये जमा करावी. एसटी विभागाने सदर माहिती संकलीत करण्याकरिता नियुक्त केलेल्या अधिकारी /कर्मचारी यांनी सदर माहिती संबंधित तहसिल कार्यालयात रोजच्या रोज सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जमा करावी. तहसिलदारांनी सदर यादी मुख्‍याधिकारी, गट विकास अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्‍य अधिकारी, ग्राम/प्रभाग नियंत्रण समितीकडे पाठवावी. जेणेकरुन येणाऱ्या लोकांची संख्या आणि नावे ग्राम नियंत्रण समितीला समजू शकेल आणि त्यांचेवर लक्ष ठेवणे सुलभ होईल.

Ø खाजगी किंवा एसटी बस चालक/वाहकानी कोविड चाचणी अगोदरच केली असणे आवश्यक असेल. तसे न केल्यास गाडी पोहोचण्याच्या ठिकाणावर चाचणी करावी. खाजगी किंवा एसटीतील प्रवाशांनी मास्क/ सॅनिटायझारचा व्यवस्थित वापर करणे अनिवार्य असल्याची समज वाहक/चालक यांनी दयावी.

Ø उपप्रादेशिक परिवहन विभाग, जिल्हा पोलीस प्रशासन, हायवे पोलीस प्रशासन यांनी चेकपोस्टवर संयुक्तरित्या खाजगी बसेस/ मिनी बसेस तपासणी करावी.

Ø  खाजगी बसच्‍या वाहन चालकांनी खाजगी बसेसमधून आलेल्‍या प्रवाशांच्‍या माहितीची एक प्रत चेक पोस्‍टवर जमा करावी व एक प्रत संबंधित तहसिल कार्यालयात रोजच्या रोज सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेमार्फत जमा करावी. तहसिलदारांनी एसटी बसेस व खाजगी बसेस मधून आलेल्‍या प्रवाशांची यादी ग्राम नियंत्रण समितीकडे पाठवावी.

Ø  चेकपोस्टवर कार्यरत कर्मचारी यांनी लहान खाजगी वाहनांच्या (Car – Light Vehicle) चालकाकडून गाडीनंबर आणि प्रवासी संख्या व एका प्रमुख व्यक्तीचा मोबाईल क्रमांक, नाव व पत्ता याची माहिती घ्यावी.

Ø  रेल्वेमार्गे येणाऱ्या प्रवाशांची यादी संबंधित उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त करुन घ्‍यावी. रेल्‍वेमार्गे येणाऱ्या नागरिकांची नोंद करुन घेण्‍याकरिता आपले स्‍तरावरुन पथके नियुक्‍त करावीत. सदर प्रवाशांची तालुकानिहाय यादी दररोज सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत जिल्‍हा कार्यालय व तहसिलदार यांच्याकडे पाठवावी. तहसिलदारांनी सदर यादी मुख्‍याधिकारी, गट विकास अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्‍य अधिकारी, ग्राम/प्रभाग नियंत्रण समितीकडे पाठवावी. जेणेकरुन येणाऱ्या लोकांची संख्या आणि नावे ग्राम नियंत्रण समितीला समजू शकेल आणि त्यांचेवर लक्ष ठेवणे सुलभ होईल. सदर कामकाजावर नियंत्रण ठेवण्याकरिता नोडल अधिकारी म्‍हणून वर्षा शिंगण यांनी काम पहावे.

Ø  गणेशोत्‍सवाकरिता नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात येणाऱ्या प्रवाशांची यादी संबंधित मुख्‍याधिकारी यांनी तहसिलदार यांच्याकडून रोज सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत प्राप्‍त करुन घेऊन त्‍याबाबत नियोजन करावे.

Ø   प्रवाशांच्या याद्या ग्राम नियंत्रण समितीकडे प्राप्त झाल्यानंतर संबंधित तालुका आरोग्य अधिकारी/ वैद्यकीय अधिकारी/ वैद्यकीय अधिक्षक यांनी त्‍यांचे यंत्रणेमार्फत (PHC, अंगणवाडी सेविका, आशा इ. मार्फत) त्याच दिवशी दोन डोस न घेतलेले व 72 तासापूर्वी कोरोना चाचणी अहवाल न आणणाऱ्या जिल्हयाबाहेरुन आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचे सूक्ष्म नियोजन करावे.

Ø  चाचणीमध्ये बाधित आढळणाऱ्या किंवा लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींना तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यांत यावे.

Ø  तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणासाठी संबंधित गटविकास अधिकारी/ तालुका आरोग्य अधिकारी आणि तहसीलदार यांनी ग्रामस्तरावर इमारतीचे नियोजन करावे. यामध्ये ग्रामस्थांच्या सहभागाने केंद्र निश्चित करावे. तद्नंतर आवश्यकता भासल्यास त्यांना नजिकच्या CCC/DCHC/DCH मध्ये हलविण्यात यावे.

Ø  तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनामार्फत पाणी, वीज व वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्या.

Ø  कोरोना चाचणीस व कोरोना बाधित व्यक्तीच्या विलगीकरणास विरोध करणाऱ्या व्यक्तींवर पोलीसांमार्फत कारवाई करण्यात यावी.

Ø  ग्राम नियंत्रण समितीने आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गर्दी होणार नाही व कोविडच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

Ø  गावातील/ शहरातील दुकानदार/ भाजी, फळ, फूले विक्रेते व ग्राहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्‍क न वापरणाऱ्यांवर संबंधित तहसिलदार/ मुख्‍याधिकारी/पोलीस/ग्रामपंचायत यांनी दंडात्‍मक कार्यवाही करावी.

Ø  जिल्हयामध्ये बाहेरुन आलेल्या प्रवाशांची माहिती दररोज उपविभागीय अधिकारी (रेल्‍वे), उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, (खाजगी वाहने, ट्रॅव्‍हल्‍स) तहसिलदार (एस.टी) यांनी तसेच प्रवाशांच्‍या कोविड चाचणीबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावी व त्याच दिवशी सायंकाळी  5.00 वाजलेपासून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंतचा असा एकंदर 24 तासांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाचे रिपोर्टींग अधिकारी संजय गवस, नायब तहसिलदार (9423950942) व विजय वरक, नायब तहसिलदार (9423236054) यांच्याकडे सादर करावी.

Ø  शुभांगी साठे, निवासी उपजिल्‍हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी माहिती संकलनासाठी आवश्यक त्या कर्मचाऱ्यांचे पथक नेमून माहिती घ्यावी व अद्ययावत माहिती तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे दररोज न चुकता सादर करावी.

Ø  सरपंच/ग्रामसेवक/ तलाठी व नगरपालिका क्षेत्रात मुख्याधिकारी यांनी ग्राम/ प्रभाग नियंत्रण मिळालेली माहिती संकलित करुन ती संबंधित तहसीलदार यांना देणे.

Ø  गावात/ शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक असल्यास पोलीस मित्र, होमगार्ड, स्वयंसेवी संस्था, युवक इ. यांची मदत घ्यावी. तालुका दंडाधिकारी/ पोलीस निरीक्षक/ गटविकास अधिकारी/ तालुका आरोग्य अधिकारी यांनी संयुक्तपणे समन्वयाने आपल्या कार्यक्षेत्रातील परिस्थिती योग्य प्रकारे हाताळावी.

Ø  राष्ट्रीय महामार्ग / राज्य मार्गावर ज्या ज्या ठिकाणी मदतकेंद्र स्थापन करणेत आले आहेत व तेथे उपलब्ध सुविधांची माहिती (क्रेन/ ॲम्ब्यूलन्स) प्रसार माध्यमांमार्फत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभाग, आरोग्य विभाग यांनी प्रसिध्द करावी.

Ø  राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणांवर मोठे कॅट आय रिफ्लेक्टर आणि ठळक व मोठे दिशा दर्शक फलक लावावेत. अधिक्षक अभियंता, सा.बां.विभाग यांचे अधिनस्त राज्य मार्ग व कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंधुदुर्ग यांचे अधिनस्त असलेल्या मार्गांवरील खड्डे भरण्याची कार्यवाही तांतडीने करावी. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग यांवर आवश्यक त्या‍ठिकाणी डायव्हर्शन बोर्ड लावावे. अपघात प्रवण क्षेत्रातील झाडे-झुडपे प्राधान्याने तोडण्यात यावीत.

Ø  अपघात प्रवण क्षेत्रांवर अपघात घडल्यास तातडीची कार्यवाही म्हणून महत्वाची ठिकाणे निश्चित करुन त्याठिकाणी आरोग्य विभागामार्फत रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात व अशा उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती होण्याच्या दृष्टीने त्याबाबत कोष्टक तयार करण्यात यावे. उदाहरणार्थ ठिकाण, ॲम्ब्युलन्स नंबर, वाहन चालकाचे नाव व संपर्क क्रमांक / पर्यायी नंबर, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व नंबर थोडक्यात असे असावे.

Ø  जिल्हा शल्य चिकित्सक, सिंधुदुर्ग यांनी 108 च्या ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करावी. ॲम्ब्यूलन्समध्ये स्ट्रेचर असणे आवश्यक आहे. याकामी वर नमुद केल्याप्रमाणे विहित नमुन्यात यादी प्रसिध्द करावी.

Ø  राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्यांच्या अधिनस्त येणाऱ्या महामार्गावर पॅच निहाय क्रेन उपलब्ध ठेवाव्या. त्यानुसार पॅचचे नाव, क्रेन नंबर, क्रेन चालकाचे नाव व नंबर, प्रोजेक्‍ट मॅनेजरचे नाव व नंबर आणि संबंधित कार्यालयीन अधिकारी यांचे नाव व नंबर सह अद्ययावत कोष्टक तयार करुन त्याबाबत आवश्यक ती प्रसिध्दी द्यावी.

Ø  गणेशमूर्ती विसर्जनकामी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी. तसेच मा. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नैसर्गिक जलस्त्रोतांच्या ठिकाणी मूर्ती विसर्जनास पूर्ण बंदी आहे. त्यामुळे वॉर्ड निहाय शाळांमध्ये किंवा इतर योग्य ठिकाणी कृत्रिम तलाव / हौद / टाक्या निर्माण कराव्यात व विसर्जन स्थळी तसेच वॉर्ड निहाय निर्माल्य कलश ठेवावेत.

Ø  रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सव कालावधीत रेल्वेचे वेळापत्रक उपलब्ध करुन घेऊन रेल्वेच्या वेळापत्रकानुसार एस.टी.बसेस उपलब्ध करुन देणेबाबत विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सिंधुदुर्ग यांनी कार्यवाही करावी. याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्टेशनवरुन गावात जाण्यासाठी एस.टी. बसेसची संख्या वाढवावी.

Ø  संभाव्य अतिवृष्टी विचारात घेऊन सर्व संबंधित यंत्रणानी मनुष्यबळ वाढवून सतर्क रहावे. वेधशाळेचे संदेश/ इशारे जिल्हा नियंत्रण कक्षाने तात्काळ संबंधित यंत्रणांना कळवून प्रसार माध्यमांद्वारे प्रसिध्द करावे.

Ø  पोलीस यंत्रणेंनेही सतर्क रहावे. महामार्ग बंद झाल्यास त्यासाठी पर्यायी मार्गाचे नियोजन करावे व त्यास प्रसिध्दी द्यावी. नॅशनल हायवेच्या अभियंत्यांशी संपर्क करुन त्यांच्या आदेशाने पूलावरील वाहतूक/ रस्ता बंद करणे किंवा चालू करणे याबाबतचे निर्णय घ्यावेत. रस्ता चालू, बंद करण्याबाबतच्या आदेशांची पोलीस स्टेशन डायरीत नोंद ठेवावी.

Ø  हायवे वरील दरड कोसळण्या सारख्या घटनांसाठी पूर्वतयारी म्हणून आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवावी, त्यांचे नियोजन करावे.

Ø  महामार्ग पोलीसांनी Black spot च्या ठिकाणांवर वाहनांचा वेग मर्यादित राहतील व अपघांतांना आळा बसेल असे नियोजन करावे.

Ø  गणेशोत्सव कालावधीत विद्युत पुरवठा अखंडीत राहील यासाठी विद्युत वितरण कंपनीने दक्ष रहावे.

Ø  कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम/ सूचना पाळून सिंधुदुर्गकरांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − nine =