You are currently viewing “प्रत्येकाच्या संग्रही असावा असा “पाचवा कोपरा”

“प्रत्येकाच्या संग्रही असावा असा “पाचवा कोपरा”

*ज्येष्ठ लेखिका गझलकारा प्रा.सुनंदामाई पाटील लिखित कथासंग्रहाचं कवयित्री पुष्पा कोल्हे यांनी केलेलं पुस्तक परीक्षण*

 

*”प्रत्येकाच्या संग्रही असावा असा “पाचवा कोपरा”*

 

कथासंग्रह – “पाचवा कोपरा ”

लेखिका – प्रा. सुनंदा पाटील मुंबई

शब्दान्वय प्रकाशन मुंबई

किंमत रु .२५० / –

संपर्क -८४२२०८९६६६

 

“आम्ही लेखिका ” च्या अध्यक्ष प्रा. सुनंदा पाटील यांचा नवाकोरा कथासंग्रह वाचनाच्या प्रतिक्षेत होताच . यापूर्वी मी सुनंदामाईंच्या गझला (व काही साहित्य) वाचल्या होत्या . पण कथासंग्रह नव्हता वाचलेला. शब्दान्वय प्रकाशन, मुंबई तर्फे “पाचवा कोपरा” हा माईंचा कथासंग्रह ‘लवकरच येतोय’ असं कळल्यापासूनच तो वाचण्यासाठी मी उत्सुक होते. कथासंग्रहाचे शीर्षकच त्याच्या वेगळेपणाची जाणीव करून देतं व वाचकालाही आकर्षित करतं.

उत्कृष्ट कवयित्री , गझलकारा म्हणून व आम्ही लेखिकेच्या अध्यक्ष म्हणून माई सर्वांना परिचित आहेत . अत्यंत ताकतवर शेर असलेल्या आशयसंपन्न गझल माई लिहतात. गद्यलेखन सुद्धा तसंच विलक्षण ताकदीचं अर्थात दर्जेदार आहे, हे सांगणे न लगे!

जीवनात जेवढे अनेक प्रकारचे चढ-उतार येतात; तेवढा माणूस समृद्ध होत जातो आणि मग लेखणीही तेवढीच प्रगल्भ होत जाते. याची प्रचीती प्रस्तुत कथासंग्रह वाचताना वाचकाला जागोजागी जाणवत राहते .

“पाचवा कोपरा “या कथेची नायिका मराठी लेखिका असून, घरात तिला तिच्या मनाप्रमाणे काही करता येत नाही. तिची प्रचंड घुसमट होतेय, कुचंबणा होतेय . तिला लेखन करायचं असतं पण ते करू दिलं जात नाही; वरून वेळोवेळी मराठी भाषेबद्दल काहीबाही अपमानास्पद असं तिला ऐकावं लागतं अशावेळी एक जागरूक मराठी लेखिका म्हणून ती काही उपाय करते आणि स्वतःसोबतच मराठीलाही कसं मोठं करते हे वाचताना वाचक त्या नायिकेच्या प्रेमातच पडतो!ही नायिका जणू आपल्या मनातलंच करू पाहतेय असं वाटून वाचक उत्सुकतेने पुढे वाचत राहतो. आपल्या मातृभाषेचा अनादर कोणाला बरे आवडेल?

या संग्रहातील प्रत्येक कथा वाचताना ती जणूकाही आपलीच आहे असं वाचकाला वाटू लागतं. सभोवती घडणाऱ्या घटनांचा लेखाजोखा, तसेच दोन किंवा प्रसंगी तीन पिढ्यांचा संघर्षही चपखलपणे ह्या कथांमध्ये आढळतो. एकीकडे सर्व सुखे हात जोडून उभी असणारी नवी पिढी आणि हाल, अपेष्टा, कष्ट सोसून स्वबळावर पुढे आलेली जुनी पिढी यांच्यातील संघर्ष आज घरोघरी चाललेला आपण पाहतो त्याचं मूर्तिमंत रूप माईंच्या ह्या कथांमध्ये आपल्याला दिसतं! या संग्रहात एकूण सोळा कथा आहेत. या सर्व कथा सर्व वयोगटातील समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील. आयुष्याच्या उतरणीला लागलेल्या ज्येठांची तरुण पिढीला अडगळ वाटू लागते. वास्तविक घरासाठी, कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी त्यांनी आयुष्यभराची कमाई खर्च केलेली असते. लेखिका प्रगल्भतेने अशा पिढीच्या समस्यांचा आपल्या कथांमध्ये मागोवा घेते व त्यावर उपायही सुचवते.

हल्ली वृद्धाश्रमांची वाढती समस्या चिंतेचा विषय बनली आहे. कित्येकदा घरातलीच तरुण मंडळी त्यांना वृद्धाश्रमाचा मार्ग दाखवते किंवा ज्येष्ठ व्यक्ती नाईलाजाने वृद्धाश्रमात दाखल होतात.

समाजातील विविध स्तरांत वृद्धांच्या समस्यांचं स्वरूप वेगवेगळं दिसतं. लेखिका समस्यांचं विचक्षण दृष्टीने निरीक्षण करते व प्रभावीपणे त्या आपल्या कथांमधून मांडते.

कथा वाचून, मी एक वाचक विचार करू लागले व एका विशिष्ट निष्कर्षाप्रत आले, की प्रत्येक ज्येष्ठाने आपल्या आयुष्याची पूंजी सगळीच्या सगळी घरातील कुणाच्याच नावावर करून देऊ नये. मूळातच दोन पिढ्यांमधला संघर्ष वाढत आहे तसेच त्यांमधील अंतरही वाढत आहे त्यामुळे समाजात विविध प्रश्न निर्माण होत आहेत. विभक्त कुटुंब, पाळणाघरांमधील मुलं, कमवत्या किंवा घरांत राहणाऱ्याही सुनेची अरेरावी, मुलगा-सून यांनी आई -वडिलांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती, आजी किंवा आजोबांना वृद्धावस्थेत आलेलं एकाकीपण, भरल्या घरी किंवा वृद्धाश्रमात आलेलं एकटेपण, संपत्तीबाबत वाद-संघर्ष,.. इ.

आयुष्याच्या निवृत्तीपर्यंतचा प्रवास फक्त कुटुंबासाठी झटण्यातच म्हणजे वेळ, श्रम, शक्ती अन पैसा देण्यात गेला . “जिवंत राह्यलो पण जगलो नाही ” अशी ही मंडळी, जेव्हा काही करायला हवं असं म्हणतात, तेव्हा घरातून होणारा विरोध आणि त्यांना गृहीत धरणं आपण सगळीकडे बघतोच . हाच संदर्भ, विचार ताई आपल्या कथांमधून सहेतुकतेने मांडतात.

जन्मदात्यांकडे मुलं सरळ दुर्लक्ष करतात , त्यांच्याकडून पैसा-अडका, संपत्ती, त्यांचे कष्ट, त्यांचा वेळ यांची अपेक्षा मात्र धरतात . अशावेळी ज्येष्ठांनीही आपली ताकद ओळखून कसे वागायला हवे, हा मंत्र सांगणाऱ्या कथा ह्या संग्रहात आहेत.

” जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये ” असं म्हटलं जातं. ज्येष्ठ, वयोवृद्ध आई किंवा वडील भावनिक होतात आणि नकळत सारे काही मुलांच्या नावे करून देतात. अशा वेळी हतबलतेशिवाय हाती काही उरत नाही; काय करावं हेही सुचत नाही. सुचलं तरी ते करण्याइतपत, शारीरिक, मानसिक बळ नसतं .. हेही इथे उघडपणे लक्षात येतं .

घरजावई असणाऱ्या उर्मट जावयाला आणि मुलीला ” बाहेरचा रस्ता ” सांगणारी सासूही कथेत दिसते. आपल्याला कधीतरी ‘नाही’ असं ठणकावून सांगता यायला हवं नाही का?

ह्या कथांमधून ह्या गोष्टी स्वीकारार्ह आहेत .

वयाच्या साठीनंतर लेखनाचा सूर गवसलेली बहुआयामी शारदा वागळे जेव्हा आपल्याला भेटते , तेव्हा तिच्या जागी आपल्याला लेखिका दिसू लागते. ती अजून आपलं वय झालेलं नाही, आपण खूप काही करू शकतो ह्या आत्मविश्वासाने ती वावरते. तिचा हा वावर वाचकाला सकारात्मकतेचा विचार देतो, जगण्याची उमेद वाढवतो.

” मला आई हवी ” ही कथा सर्वांना हळवं करून, विचार करायला लावणारी आहे.

सर्वसाधारणपणे कथांतील पात्रे ही सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुबातील आहेत. त्यामुळे या सोळाही कथा वाचकाला आपल्या जवळच्या कथा वाटतात.

लेखिकेची भाषा अतिशय सहज, साधी सरळ शब्दयोजना असलेली, समृद्ध आणि संयत आहे. कुठेही ती आक्रस्ताळी होत नाही. तरीही आपले म्हणणे जबाबदारीपूर्वक सांगणारी आहे.

उत्कृष्ट छपाई, लेखिकेची आठ वर्षांची नात स्पृहा हिने काढलेले अर्थपूर्ण म्हणूनच कौतुकास्पद असे मुखपृष्ठ, मध्यम वर्गीयांचा परिसर, विचारसरणी, समाजातील आबालवृद्धांना विचार करायला लावणारे कथाबीज, विविध पैलूंना उलगडत जाणारी, सामाजिक प्रश्नांचा विचार व उपायही देणारी कथा ही महत्त्वाची वैशिष्ट्ये सदर कथासंग्रहाची दिसून येतात.

चौकोनाला चार कोन व चार बाजू असतात. आजकाल कुटुंबात ‘हम दो हमारे दो’ म्हणजे चौकोनी कुटुंब..त्यात हा ‘पाचवा कोपरा’ कोणता असावा हा विचार करत करतच वाचक कथा वाचत जातो. आत्मिक बळाचा, ‘स्व’ चा विचार करण्याचा, आपले निर्णय घेण्याचा, आत्मविश्वासाने वागण्याचा, आपले भावविश्व जपण्याचा हा एक शांत, सोशिक कोपरा *पाचवा कोपरा !* त्याला जपायला हवंच.

घराला चार भिंती आणि छत असतंच . पण चार कोपऱ्यांशिवाय एक पाचवा कोपराही असतो आणि तो असतो ज्येष्ठांचा. ज्येष्ठांनी नव्या पिढीला मदत करावी पण ती करताना माणूस म्हणून आपणही जगावं, असंच काहीसं या कथा सुचवतात . आपण सर्व सोडून गेल्यानंतर सर्वकाही मुलांचंच आहे . पण ‘आपण असताना आपणही जगून घ्यायला हवं’ . आपल्या ‘बकेट लिस्ट’ मधील यादी पूर्ण झाली का काही राह्यलंय का हे सुद्धा बघायला हवं . बालपण तारुण्य, ज्येष्ठत्व, वृद्धत्वापलीकडील हा पाचवा कोपरा! धर्म, अर्थ, काम, मोक्ष या पलीकडे काही सुचवतोय का हा कथासंग्रह?

पण नको, या कथांमध्ये नेमके काय आहे, हे मी उघड करत नाही. खरं तर, प्रत्येक कथेचा सारांश सांगण्याचा मोह मला होतोय पण तो मी आवरते.

आपण एकदा जरूर हा कथासंग्रह वाचा ज्येष्ठांनी तर वाचावाच पण निवृत्तीकडे झुकणाऱ्या प्रत्येकानी स्त्री-पुरुषांनी हा संग्रह संग्रही ठेवावा आणि ज्येष्ठत्वाकडे वाटचाल करणाऱ्या सर्वांना भेट म्हणून द्यावा, ही या संग्रहाची योग्यता आहे.

 

रसग्रहण

—-पुष्पा कोल्हे

चेंबूर, मुंबई ७१

 

 

“पाचवा कोपरा ”

ले . प्रा. सुनंदा पाटील

प्रकाशक – शब्दान्वय प्रकाशन कल्याण

किंमत २५० रू .

संपर्क – ८४२२०८९६६६

प्रतिक्रिया व्यक्त करा