You are currently viewing जिल्हा परिषदेची विकासकामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

जिल्हा परिषदेची विकासकामे जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे

जिल्हा वार्षिक योजनेतून मुबलक निधी; गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देश

निधी अखर्चित राहू देऊ नका, सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम करा

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा परिषदेला मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून हाती घेण्यात आलेली सर्व विकासकामे व प्रकल्प कालबद्ध नियोजनातून राबवून ती गुणवत्तेसह जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परब, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले तसेच जिल्हा परिषदेच्या विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सर्व यंत्रणांनी हाती घेतलेली विकासकामे गुणवत्तेसह वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित विभागांची आहे. प्रत्येक काम दर्जेदार व टिकाऊ असावे. विकासकामांची आखणी करताना दर्जात्मक बाबींमध्ये कोणतीही तडजोड करू नये. तसेच जिल्हा परिषदेला विकासासाठी उपलब्ध करून दिलेला निधी वेळेत खर्च करण्यात यावा. कोणत्याही विभागाचा निधी अखर्चित राहू नये किंवा समर्पित होऊ नये, याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा