मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
मातोश्री विद्यामंदिर, मानखुर्द, मुंबई येथे अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन व आय.टी.सी. यांच्या वतीने पर्यावरण जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत शाळेतील इयत्ता सहावी, सातवी व आठवीच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचरा व्यवस्थापन विषयावरील क्रियाशील पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.
प्लास्टिक कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, याबाबत शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. या पुस्तिकांमधून प्लास्टिकची निर्मिती, त्याचे विविध प्रकार, ३ आर—रिड्यूस, रियुज व रिसायकल ही संकल्पना, प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन तसेच त्याचा पुनर्वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. रंजक व सहभागात्मक क्रियाकलापांमुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून, त्यांना पर्यावरण संवर्धनाची जाणीव प्रभावीपणे समजत आहे.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. पाटील तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होता. यावेळी अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनचे ए.व्ही.पी. प्रोग्राम कोऑर्डिनेटर श्री. प्रदीप कासुडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम व पर्यावरण संरक्षणाची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक सवयी रुजवल्याने विद्यार्थ्यांचा मानसिक व सामाजिक दृष्टिकोन सुधारेल आणि ते भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून पुढे येतील. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निश्चितच दृढ होण्यास चालना मिळणार आहे.
