*कलातपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा उपक्रमशील शिक्षिका स्वाती पाटील यांना पुरस्कार प्रदान*
*बांदा*
कणकवली येथील कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा जिल्हास्तरीय कै. सौ. उमा काणेकर स्मृती उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार यावर्षी दोडामार्ग तालुक्यातील मोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षिका स्वाती पाटील यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार वितरण सोहळा कोकणातील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राम मेस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. यावेळी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक एकनाथ आव्हाड, कणकवली हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ. पी. जे. कांबळे, संपादक व प्रसारक प्रकाश केसरकर, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष महेश काणेकर, कार्यवाह प्रशांत काणेकर तसेच साहित्यिका कल्पना मलये आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते स्वाती पाटील यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले शैक्षणिक, सांस्कृतिक व उपक्रमशील कार्य लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या कार्यक्रमात कला, साहित्य व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा तसेच विविध क्षेत्रांत प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना स्वाती पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या पुरस्कारासाठी कोणताही प्रस्ताव मागवला जात नाही. त्रयस्थ व्यक्तींकडून वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून निवड केली जाते, त्यामुळे या पुरस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे..तसेच कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी व आदर्शवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम यांनी प्रभावीपणे केले.
