कोकण विभागातील उद्योजकांना वैध मापन शास्त्र विभागातर्फे मार्गदर्शन
सिंधुदुर्गनगरी
वैधमापन शास्त्र नियमांचे पालन करणे प्रत्येक आस्थापनेचे कर्तव्य असून ग्राहकांचा विश्वास मिळवण्यासाठी अचूक व पारदर्शक माहिती देणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वैधमापन शास्त्र, कोकण विभागाचे सहनियंत्रक शिवाजी काकडे यांनी दिली.
नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत वैधमापन शास्त्र, कोकण विभागाच्या वतीने कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादक, आयातदार तसेच पेट्रोल-डिझेल वितरक आस्थापनांसाठी विशेष मार्गदर्शक सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास वैधमापन शास्त्र सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनियंत्रक विकास लाटे, इतर वरिष्ठ अधिकारी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादक, आयातदार व पेट्रोल-डिझेल वितरक आस्थापनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सत्रात पेट्रोल-डिझेल उत्पादक व आयातदारांनी उत्पादित व आयातीत वस्तूंवर नमूद करावयाच्या बंधनकारक माहितीबाबत, विक्री प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी तसेच ग्राहकांच्या तक्रारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
वैधमापन शास्त्र अधिनियम 2009 व महाराष्ट्र वैधमापन शास्त्र नियम 2011 नुसार सर्व उत्पादक व आयातदारांनी आपल्या वस्तूंवर आवश्यक माहिती स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक आहे. चुकीची माहिती, अपूर्ण तपशील किंवा ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी हे नियम काटेकोरपणे अंमलात आणले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
मार्गदर्शन सत्रात विशेषतः इलेक्ट्रॉनिक मापन उपकरणे वापरताना अचूकता राखणे, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे तसेच आस्थापनांनी तक्रार निवारणासाठी दूरध्वनी क्रमांक उपलब्ध करून देणे याबाबत सूचना देण्यात आल्या.
प्रत्येक वस्तूवर पुढील माहिती स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले:
- उत्पादक/आयातदाराचे पूर्ण नाव व पत्ता (पिनकोडसह)
- वस्तूचे नाव निव्वळ वजन किंवा माप
- उत्पादन किंवा आयातीचा महिना व वर्ष
- कमाल किरकोळ विक्री किंमत (MRP)
- युनिट सेल प्राईस
- ग्राहक तक्रार निवारण तपशील
उपस्थितांनी उपस्थित केलेल्या शंकांचे अधिकाऱ्यांनी निरसन केले. विशेषतः पॅकेजिंगवरील माहिती, वजन-मापांची अचूकता आणि ग्राहक तक्रार निवारण प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
