बांदा येथे उत्पादन शुल्कची मोठी कारवाई
गोव्यातील अवैध मद्य वाहतूक करणारा कंटेनर जप्त, ५० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बांदा
राज्य उत्पादन शुल्क विभागाने बांदा येथे मोठी कारवाई करत गोव्यातील अवैध विदेशी मद्याची वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात घेतला आहे. या कारवाईत सुमारे ५० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुजरात येथील याज्ञेशकुमार राजेंद्रकुमार शुक्ला (वय ५०) याला अटक करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ४० लाख ५६ हजार रुपयांचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य, १० लाख रुपये किमतीचे वाहन आणि १० हजार रुपयांचा मोबाईल यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली तपासणी नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. गोव्याकडून अशोक लेलँड कंपनीचा चॉकलेटी रंगाचा सहाचाकी बंद बॉडी कंटेनर संशयास्पदरीत्या येत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास वाहनाची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान वाहनाच्या मागील भागात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे बॉक्स लपवून ठेवले असल्याचे उघड झाले.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक मिलिंद गरुड, दुय्यम निरीक्षक धनंजय साळुंखे, विवेक कदम, तसेच पथकातील रणजीत प्रेम, दीपक वायंदे, सागर सूर्यवंशी, अभिषेक खत्री (स्त्री), सतीश चौगुले यांनी केली. सदर प्रकरणाचा पुढील तपास धनंजय साळुंखे, दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली करीत आहेत.
