शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात, पित्ताशयाच्या गँग्रीनची शस्त्रक्रिया यशस्वी
सिंधुदुर्गनगरी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे पित्ताशयाच्या गॅग्रीनची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली आहे.
मालवण तालुक्यातील ६४ वर्षीय महिलेला अचानक पोटदुखीचा त्रास झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग येथे 3 डिसेंबर 2025 रोजी सर्जरी विभागात दाखल करण्यात आले. या महिलेच्या पोटाच्या उजव्या व वरच्या बाजूला प्रचंड वेदना होवून उलट्या होत होत्या.
रुग्णाच्या रक्ताच्या तपासण्या करुन रुग्णावर प्राथमिक उपचार सुरु करण्यात आले. सी. टी. स्कॅन केल्यानंतर पित्ताशयावर सूज होती. पित्ताशयामध्ये खडे असल्याने तसेच पित्ताशय पोटात फुटल्याचे निदान करण्यात आले. सर्जरी विभागाचे विभाग प्रमुख तथा प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेदरम्यान पित्ताशयाच्या काही भागाचा गँग्रीन झाला असल्याचे निष्पन्न झाले. ही शस्त्रक्रिया गुंतागुंतीची असल्याचे निदर्शनास आले. शर्थीचे प्रयत्न करुन या रुग्णाचे पित्ताशय काढण्यात आले. सर्जन डॉ. अनंत डवंगे व त्यांच्या चमूतील डॉ. निखिल जाधव, डॉ. मोनालिसा वजराटकर, इंटर्न सिजिथ राजेंद्रन यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
बधिरीकरणशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सरिता ठाणेकर व त्यांच्या चमूतील डॉ. आकांक्षा उपासे, डॉ. यश कनबर, डॉ. धनश्री केने यांनी यशस्वीरीत्या रुग्णाला ऍनेस्थेशिया दिला. शस्त्रक्रियेमध्ये स्टाफ नर्स श्रीमती. करिष्मा कवडेकर व श्रीमती रुपक कुडाळकर यांचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाचा त्रास कमी झाला व रुग्ण पूर्ण बरा झाल्यानंतर 18 डिसेंबर 2025 रोजी या रुग्णाला रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली आहे.
