You are currently viewing जनजाती कल्याण आश्रम आणि संघाच्या संपर्कातून बारीपाडा विकसित होण्याची मुहूर्तमेढ! – पद्मश्री चैत्राम पवार

जनजाती कल्याण आश्रम आणि संघाच्या संपर्कातून बारीपाडा विकसित होण्याची मुहूर्तमेढ! – पद्मश्री चैत्राम पवार

*जनजाती कल्याण आश्रम आणि संघाच्या संपर्कातून बारीपाडा विकसित होण्याची मुहूर्तमेढ! – पद्मश्री चैत्राम पवार*

पिंपरी
‘जनजाती कल्याण आश्रम आणि संघाच्या संपर्कातून बारीपाडा विकसित होण्याची मुहूर्तमेढ रोवली गेली; आणि संवर्धन, संरक्षण, पुनर्निर्माण या त्रिसूत्रीतूनच बारीपाडा येथे शाश्वत विकास साध्य झाला!’ असे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रम, देवगिरी प्रांत अध्यक्ष पद्मश्री चैत्राम पवार यांनी मनोहर वाढोकर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी जनजाती कल्याण आश्रम पश्चिम क्षेत्र हितरक्षा प्रमुख युवराज लांडे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत केले. वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त जनजाती कल्याण आश्रम, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमेळाव्यात रेनीषा इंडिया लिमिटेडचे संचालक विकास सक्सेना, जनजाती कल्याण आश्रम, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष सुरेश गुरव, उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी, सचिव यशवंत भोंग यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचा परिचय अनिता वझे यांनी करून दिला.
चैत्राम पवार यांनी मुलाखतीतून धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या बारीपाडा या आदिवासीबहुल गावाचा शाश्वत विकास कसा घडला याविषयी सविस्तर वृत्तान्तकथन केले. १९९१ पूर्वी दुष्काळग्रस्त, व्यसनाधीन आणि शिक्षणाचा अभाव असलेल्या या छोट्या खेड्यात डाॅ. आनंद फाटक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते एका झोपडीत वास्तव्यास होते. त्यांच्याविषयी कुतूहल वाटल्याने मी संघ, जनजाती कल्याण आश्रम यांच्या कार्याकडे आकृष्ट झालो. जंगल संवर्धन आणि पर्यावरण रक्षण या कार्यासाठी जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन ही पंचसूत्री स्वीकारून नावीन्यपूर्ण उपक्रम अन् प्रयत्नांतून ग्रामस्थांना एकत्र करून जंगलाचे पुनरुज्जीवन केले. बंधारे बांधून पाणीटंचाई दूर केली. बदनाम मानल्या गेलेल्या मोहाच्या झाडांना कल्पतरू केले. महिला सक्षमीकरण केले. त्यामुळे बारीपाड्यातील रहिवासी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत. बारीपाडा प्रकल्पाची दखल घेऊन पद्मश्री सन्मान जाहीर झाल्यानंतर सुमारे ३१ कार्यकर्त्यांसह तो स्वीकारण्यासाठी गेलो; कारण हा सन्मान जनजाती कल्याण आश्रमातील असंख्य ज्ञात – अज्ञात कार्यकर्त्यांचा आहे, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

मुलाखतीपूर्वी, ॲड. किरण गभाले आणि आदित्य जोशी यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. तसेच जनजाती कल्याण आश्रम, पिंपरी – चिंचवड शाखेतील विशेष प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले. यशवंत भोंग यांनी प्रास्ताविक केले. विकास सक्सेना आणि सुरेश गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. जनजाती कल्याण आश्रम, पिंपरी – चिंचवड शाखेच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. हरिभाऊ खरात यांनी सूत्रसंचालन केले. अनिल कुलकर्णी यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा