You are currently viewing एमआयटी एडीटी विद्यापीठाला आयडीए पुरस्कार प्रदान

एमआयटी एडीटी विद्यापीठाला आयडीए पुरस्कार प्रदान

*एमआयटी एडीटी विद्यापीठाला आयडीए पुरस्कार प्रदान*

*शाश्वतता व हरित कौशल्य शिक्षणातील नवकल्पनांसाठी घेतली गेली नोंद*

नवी दिल्ली:

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी एडीटी) विद्यापीठ, पुणे यांना शाश्वतता व हरित कौशल्य शिक्षणातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रतिष्ठित ‘आयडीए पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला आहे. इंडिया डिडॅक्टिक्स असोसिएशन (आयडीए), नवी दिल्ली यांच्या वतीने देण्यात येणारा हा राष्ट्रीय पुरस्कार “शाश्वतता व हरित कौशल्य शिक्षणातील नवकल्पना” या विशेष श्रेणीत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा यशोभूमी येथील इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर (आयआयसीसी), नवी दिल्ली येथे पार पडला.

शाश्वत विकास, पर्यावरणीय जबाबदारी आणि हरित कौशल्य विकासाला चालना देणाऱ्या विद्यापीठाच्या अभिनव शैक्षणिक पद्धती, संशोधनाधारित उपक्रम आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी (एसडीजीएस) सुसंगत असलेल्या विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन, कॅम्पस व्यवस्थापन आणि सामाजिक उपक्रमांचा सविस्तर आढावा घेणाऱ्या एसडीजीएस अहवालाच्या आधारे हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

स्थापनेपासूनच एमआयटी एडीटी विद्यापीठ हे बहुविषयक, नव्या पिढीचे विद्यापीठ म्हणून शैक्षणिक गुणवत्ता, नवोन्मेष, शाश्वतता आणि सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहिले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत शिक्षण, संशोधन, उद्योजकता, हरित उपक्रम आणि समाजाभिमुख कार्य यांवर भर देत विद्यापीठ जबाबदार जागतिक नागरिक आणि भविष्यकालीन व्यावसायिक घडवत आहे. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या कॅम्पस पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जेचा अवलंब, आयजीबीसी प्लॅटिनम मानांकन प्राप्त कॅम्पस, शाश्वततेवर आधारित अभ्यासक्रम, अटल इन्क्युबेशन सेंटर (एआयसी), क्रेया तसेच व्यापक सामाजिक उपक्रमांमुळे एमआयटी-एडीटी विद्यापीठाने शाश्वत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रणी स्थान मिळवले आहे.

या यशामागे विद्यापीठाचे प्र-कुलपती प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालिका डॉ. सुनीता कराड, कुलगुरू डॉ. राजेश एस., अधिष्ठाता डॉ. व्ही. व्ही. शेटे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे नोंदणी अधिकारी तसेच विविध शाळांचे अधिष्ठाता शाश्वतता व नवोन्मेषाधारित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत.

हा प्रतिष्ठित पुरस्कार नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात विद्यापीठाच्या वतीने प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर आणि उप-कुलसचिव प्रा. हनुमंत पवार यांनी स्वीकारला. या सन्मानामुळे शाश्वत शिक्षण आणि हरित कौशल्य विकासासाठी एमआयटी-एडीटी विद्यापीठाची कटिबद्धता अधिक दृढ झाली असून, हरित व शाश्वत भविष्य घडविण्याच्या राष्ट्रीय व जागतिक प्रयत्नांना विद्यापीठाकडून भक्कम योगदान दिले जात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा