You are currently viewing मालवण प्रभाग सातमध्ये आचरेकरांची विजयी मुसंडी
Oplus_16908288

मालवण प्रभाग सातमध्ये आचरेकरांची विजयी मुसंडी

सुदेश आचरेकरांच्या यशामुळे मालवणच्या राजकारणात खळबळ; भाजपवर थेट हल्लाबोल

 

मालवण :

मालवण पालिकेच्या निवडणुकीत माजी नगराध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार सुदेश आचरेकर यांनी प्रभाग सातमधून दणदणीत विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली. या विजयानंतर “टायगर अभी जिंदा है” अशी ठाम प्रतिक्रिया देत त्यांनी विरोधकांना थेट संदेश दिला असून, मालवणच्या राजकारणात हा विजय मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.

या निवडणुकीत प्रभाग सात हे सर्वांचे लक्ष वेधून घेणारे केंद्र ठरले होते. बाजी मारल्यानंतर आचरेकर म्हणाले, “मित्रमंडळी, कुटुंबीय आणि प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे अपक्ष उमेदवाराची ताकद मी पुन्हा दाखवून दिली आहे. माझी पत्नी स्नेहा आचरेकर आणि सतीश आचरेकर हे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने हा विजय शक्य झाला. प्रभागातील विकासकामांची पोचपावती नागरिकांनी मतांच्या माध्यमातून दिली आहे.”

ते पुढे म्हणाले, “पालिका निवडणुकीत मी सातव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलो आहे. राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम मतदारांनी केले आहे. स्थानिक नेतृत्व नसल्याने भाडोत्री नेतृत्वाच्या जोरावर लढत देण्याचा प्रयत्न झाला. गेली अनेक वर्षे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी भाजप व खासदार नारायण राणे यांच्यासाठी काम केले; मात्र तरीही माझ्यावर सातत्याने अन्याय झाला.”

भाजपवर टीका करताना आचरेकर म्हणाले, “आज मालवण शहरातून भाजपला हादरे बसण्याचे कारण स्पष्ट आहे. दुसऱ्या पक्षातून आलेल्या भाडोत्री लोकांवर संपूर्ण सूत्रे सोपवण्यात आली. त्यांना केवळ निवडणूक माहिती आहे, समाजसेवा नाही. त्यामुळेच भाजपला हा पराभव पत्करावा लागला.”

आपल्या विजयाबाबत ते म्हणाले, “हा विजय नेत्रदीपक आहे. प्रभागातील ज्ञाती बांधवांनी दाखवलेला विश्वास आज फळास आला आहे. नगराध्यक्ष पदासाठी महिला आरक्षण मागास प्रवर्गासाठी होते. मात्र भाजपने मराठा समाजाचा उमेदवार दिल्याने ओबीसी समाज संघटित झाला आणि ममता वराडकर यांना निवडून दिले. भाडोत्री लोकांच्या जोरावर निवडणूक जिंकता येत नाही, हे मी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. भाजपने आत्मपरीक्षण करावे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा