You are currently viewing मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे  यांनी घेतला सविस्तर आढावा

  • आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेची निगराणी
  • सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात

सिंधुदुर्गनगरी 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगरपंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रीया 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवर सुरक्षितता, पारदर्शकता व शिस्तबद्धता यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून, संपूर्ण प्रक्रियेवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत निगराणी ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी कक्ष, प्रवेशद्वार, स्ट्राँगरूम परिसर तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले.

नगरपालिका/नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 अनुषंगाने मतमोजणी पुर्वतयारीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीव्दारे जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी संवाद साधून सविस्तर आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी श्री राऊत, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, मतमोजणी केंद्रांवर पोलीस बंदोबस्त कडक ठेवण्यात येणार असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचे सर्व उपाय योजण्यात आले आहेत. केवळ अधिकृत ओळखपत्रधारकांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार ओतारी यांनी वेंगुर्ला नगर परिषदेच्या मतमोजणी तयारी विषयी  माहिती देताना सांगितले की, मतमोजणीचा कार्यक्रम तहसील कार्यालय वेंगुर्ला येथे सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे.  मतमोजणी करताना किंवा सुरक्षा कक्ष ते टेबल पर्यंतचा सर्व मार्ग सीसीटीव्ही च्या निगराणी मध्ये करण्यात येणार आहे. मतमोजणी ही चार टेबल वरती चार राऊंड मध्ये करण्यात येणार आहे. सदरील मतमोजणी कार्यक्रम सुरू करण्याआधी 45 मिनिटे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सुरक्षा कक्ष हा उघडण्यात येणार आहे. सुरक्षा कक्षास  द्विस्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आल्या कारणाने तहसील कार्यालयामध्ये कोणाचेही मोबाईल आणण्याकरता प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर प्रवेशाकरिता जे द्वारे ठेवले आहेत त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर फ्रेम्स त्याच बरोबर महिलां करिता वेगळी तपासणी यंत्रणा नियुक्त करण्यात आलेली आहे. सुरक्षा दृष्टिकोनातून तहसील कार्यालय तसेच वेंगुर्ला नगरपरिषद परिसरामध्ये शंभर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहे.

कणकवली निवडणूक निर्णय अधिकारी दिक्षांत देशपांडे यांनी मतमोजणी तयारी विषयी  माहिती देताना सांगितले की, कणकवली नगरपंचायत मतमोजणीसाठी मतमोजणी कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्यामध्ये जवळपास 30 कर्मचारी व अधिकारी मतमोजणीचे कामकाज पाहणार आहेत. सर्व मतमोजणीचे कामकाज सीसीटीव्ही मध्ये होणार आहे.  मतमोजणी पाच टेबलवर असणार आहे. पोलीस विभागामार्फत जवळपास आठ अधिकारी व 70 अंमलदार यांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. या दरम्यान सर्व व्यवस्थेची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी आज कणकवली येथे भेट देऊन केलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

मालवण  निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी माहिती देताना सांगितले की मालवण मध्ये प्रत्येक मतमोजणी टेबलवर विशेष व्हिडिओग्राफी द्वारे लक्ष्य दिले जाणार आहे. सुरक्षा कक्ष ते मतमोजणी हॉल दरम्यान सीसीटीव्हीद्वारे चित्रण केले जाणार आहे.पोलिस यंत्रणा देखील तयार आहे असेही ते म्हणाले.

सावंतवाडी मतमोजणी तयारीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर पाटील यांनी माहिती देताना सांगितले की  मतमोजणतहसील कार्यालय सावंतवाडी येथे होणार आहे. सदरील मतमोजणी कार्यक्रम सुरू करण्याआधी 45 मिनिटे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सुरक्षा कक्ष हा उघडण्यात येणार आहे. सुरक्षा कक्षास  द्विस्तरीय सुरक्षा प्रदान करण्यात आल्या कारणाने तहसील कार्यालयामध्ये कोणाचेही मोबाईल आणण्याकरता प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर प्रवेशाकरिता जे द्वारे ठेवले आहेत त्या ठिकाणी मेटल डिटेक्टर फ्रेम्स त्याच बरोबर महिलां करिता वेगळी तपासणी यंत्रणा नियुक्त करण्यात आलेली आहे. सुरक्षा दृष्टिकोनातून तहसील कार्यालय परिसरात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहे. मतमोजणी ही पाच टेबल वरती पाच राऊंड मध्ये करण्यात येणार आहे.

मतमोजणी करताना किंवा सुरक्षा कक्ष ते टेबल पर्यंतचा सर्व मार्ग सीसीटीव्ही च्या निगराणी मध्ये करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा