You are currently viewing वेंगुर्ला नगराध्यक्षपदाचा फैसला उद्या!

वेंगुर्ला नगराध्यक्षपदाचा फैसला उद्या!

मतमोजणीतून ठरणार सत्तेची दिशा; कोणाच्या गळ्यात बसेल नगराध्यक्षपदाची माळ?

वेंगुर्ला :

वेंगुर्ला नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक मंगळवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी शांततेत आणि उत्साहात पार पडली. सर्वच पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविल्याने ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. नागरिकांनी कोणाला संधी दिली आहे, हे २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.

एकूण १६ मतदान केंद्रांवर १०,११५ मतदारांपैकी ७,५१४ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून ७४.२९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी हेमंत किरूळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. मतमोजणीसाठी चार टेबलांची व्यवस्था करण्यात आली असून चार फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीअंती निवडून आलेल्या नगरसेवक उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. संपूर्ण मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी विजयी उमेदवाराचे नाव घोषित करण्यात येणार आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आले.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी दिलीप ऊर्फ राजन गिरप, विलास गावडे आणि नागेश ऊर्फ पिंटू गावडे यांच्यात चुरस असून, ८३ पैकी कोणत्या २० उमेदवारांना नगरसेवक म्हणून नागरिकांनी पसंती दिली आहे, तसेच नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतमोजणी सकाळी १० वाजता वेंगुर्ला तहसील कार्यालयात सुरू होणार असून प्रशासन सज्ज आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा