वलगावला स्पर्धा परीक्षा कार्यशाळा संपन्न
अमरावती :
विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासून काळजीपूर्वक व सातत्याने तन-मन धनाने अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यास मदत होते. म्हणून स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण लक्ष अभ्यासावर व व्यक्तिमत्त्वावर केंद्रित करावे म्हणजे यश मिळवणे सुलभ होईल असे प्रतिपादन सातारा श्री अक्षय पाटील यांनी केले. श्री प्रेमकिशोर सिकची यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहात स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते वलगाव येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ व मिशन आय ए एस चे संचालक प्रा.नरेशचंद्र काठोळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नव्याने रुजू होणारे अधिकारी श्री रजत यादवराव कावळे, भंडारा व श्री विशाल शेषराव चौधरी, जालना, श्री.अक्षय राजेंद्र पाटील सातारा हे होते.
वलगावचे सुपुत्र श्री प्रेमकिशोर सिकची यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने विविध सामजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे बरेचसे कार्यक्रम सिकची रिसॉर्ट येथे संपन्न झाले. वलगावातील स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सिकची वाचनालय येथे या सप्ताह अंतर्गत एका स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला नव्याने रुजू होणारे रजत कावळे, श्री विशाल चौधरी, श्री अक्षय राजेंद्र पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. याप्रसंगी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल या तीनही अधिकाऱ्यांचा श्री प्रेमकिशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे संचालक श्री सचिन माळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन श्री गजानन कडू यांनी केले. विचारपिठावर गावातील मनोज निर्मळ हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री रजत कावळे म्हणाले की मी भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील रहिवासी असून शिक्षणानिमित्त गडचिरोली नागपूर भंडारा याठिकाणी शिक्षण घेतले. वडील जिल्हा परिषद मध्ये शिक्षक असल्यामुळे त्यांच्या बदलीच्या गावला आमचे शिक्षण झाले. तुम्हाला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आंतरिक प्रेरणा महत्त्वाची असते. बाह्य प्रेरणा एवढी प्रभावी नसते म्हणून विद्यार्थ्यांनी आपले मनोबल आपला आत्मविश्वास वाढविणे गरजेचे आहे.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नव्याने अधिकारी झालेले साताऱ्याचे श्री अक्षय राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सुरुवातीला अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे. अभ्यासामध्ये आवड निर्माण केली पाहिजे. तसेच सुरुवातीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तसेच सिनियर्सचे मार्गदर्शन घेतले पाहिजे यावर भर दिला. आज नवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. त्याचाही वापर करण्याचे प्रतिपादन त्यांनी आपल्या वक्तव्यातून केले.
नव्याने अधिकारी झालेले श्री विशाल चौधरी हे जालना येथील असून त्यांनी आपल्या भाषणामध्ये आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा कशी उत्तीर्ण झाले याचा आढावा सादर केला. ते म्हणाले की मी सर्वसामान्य विद्यार्थी होतो. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पण मी जिद्दीने व आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलो. भाऊ नोकरीला असल्यामुळे त्याने मदत केली. सुरुवातीला यश आले नाही. पण मी माझा हट्ट सोडला नाही. आजही मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. तुम्ही चांगला अभ्यास केला सातत्याने अभ्यास केला. प्रामाणिकपणे अभ्यास केला तर त्याचे फळ मिळतेच. या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेला वलगाव मधील स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी तसेच प्रेमकिशोर सिकची शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी तीनही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच कार्यक्रमाची सांगता श्री कडू यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. या स्पर्धा परीक्षा कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा विषयक कल्पना स्पष्ट झाल्या असून बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपण त्याचा अवलंब करणार असल्याचे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
