फोंडाघाटजवळ बिबट्या जेरबंद; चार दिवसांच्या भीतीनंतर ग्रामस्थांना दिलासा
फोंडाघाट
फोंडाघाटपासून चार ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या घोणसरी गावातील बोंडकवाडी–पिंपळवाडी रस्त्याच्या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आढळून आल्याने मागील चार ते पाच दिवस स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विशेषतः शाळा सुटल्यानंतर बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे परतणाऱ्या मुला-मुलींमध्ये तसेच पालक वर्गामध्ये घबराट निर्माण झाली होती.
स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी केल्यानंतर फोंडाघाट वनविभागाचे अधिकारी कोळेकर व सारीक यांच्या पथकाने तातडीने दखल घेतली. घोणसरीचे सरपंच प्रसाद राणे, पोलीस पाटील भालचंद्र राणे तसेच समीर राणे, मिहीर मराठे, दीपक राणे व हेमंत कोंडेकर यांच्या उपस्थितीत परिसराची पाहणी करण्यात आली. बिबट्याच्या पायरोवांचा मागोवा घेत बोंडकवाडी–पिंपळवाडी रस्त्यालगत पिंजरा लावण्यात आला.
रात्री भक्षाच्या शोधात फिरणारा बिबट्या अलगद पिंजऱ्यात जेरबंद झाला. वनविभागाच्या अभ्यासपूर्ण व तातडीच्या कारवाईमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून वन अधिकारी व पथकाचे कौतुक होत आहे. बिबट्या पकडल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
दरम्यान, बोंडकवाडी व पिंपळवाडी परिसर सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या लगत असल्याने येथे जंगली श्वापदांचा वावर नेहमीच असतो. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेता वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना व सततची नोंद ठेवणे आवश्यक असल्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
