२८ डिसेंबरला राजवाडा परिसरात दुसऱ्या वर्षीही मॅरेथॉन; ७ ते २१ वयोगटातील सिंधुदुर्गातील मुला-मुलींसाठी सुवर्णसंधी
सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढीला मैदानी खेळ व ॲथलेटिक्सकडे आकर्षित करण्यासाठी सावंतवाडीत ‘सिंधु यंग चॅम्पियन रन’ या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविला जात असून, याबाबतची सविस्तर माहिती युवराज लखमराजे भोंसले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ही मॅरेथॉन स्पर्धा येत्या २८ डिसेंबर रोजी पहाटे सावंतवाडीच्या राजवाडा येथून सुरू होणार असून, धावपटू पुन्हा याच ठिकाणी स्पर्धेची सांगता करतील. ७ ते २१ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी चार स्वतंत्र गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही मॅरेथॉन केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांसाठीच खुली ठेवण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता, व्यायामाची आवड आणि निकोप स्पर्धेची भावना निर्माण व्हावी, हा आपला मुख्य उद्देश असल्याचे लखमराजे भोंसले यांनी सांगितले. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी सन्मानित करण्यात येणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपली क्रीडासामर्थ्य दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला ओंकार पराडकर, डॉ. स्नेहल गोवेकर, भूषण बांदेलकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
