*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*निंदकाचे घर असावे शेजारी*
शेक्सपिअरने म्हटलंय, “LOVE THY NEIGHBOUR.”
“शेजाऱ्यांवर प्रेम करा” पण तोच शेजारी सदानकदा अवतीभवती, आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांमध्ये, समाजात, इतरत्र कुठेही आपली निंदाच करत असेल तरीही आपण मात्र त्याच्याशी प्रेमानेच वागावे का? मग याचे उत्तर संत तुकाराम अगदी आपल्याला आंजारून गोंजारून देतात.
निंदकाचे घर। असावे शेजारी। येताति बाहेरी। गुणदोष ।।
निंदक हा माझा। कंठीचा ताईत। त्याने सर्व हित ।केले माझे ।।
स्तुती सगळ्यांना आवडते. कौतुक कोणाला नको असते? पाठीवर शाबासकी, टाळी वाजवून दिलेली मनसोक्त दाद मनाला किती सुखावते हो! आपल्या प्रत्येक कृतीला भरभरून लाईक्स देणाऱ्या मंडळींना आपण आपले खरे स्नेही, आपले कदरदान, आपले पंखे (fans) मानतो आणि तेच खरे आपल्याही गळ्यातले ताईत बनतात. उगीच निंदकाला आपण कंठीचा ताईत म्हणून दुखावलेल्या मनाने या संतांच्या मार्गावरून कसे काय जाणार?सामान्य आहोत आपण.
“ तुझा लेख आवडला गं! पण शुद्धलेखनाकडे जरा लक्ष दे बाई!”
“अगं कावळ्याच्या छत्र्या उगवाव्यात ना तसेच जिकडे तिकडे कवी उगवलेत. तुला त्यांच्यातलंच व्हायचं आहे का? आधी काव्य म्हणजे काय हे तरी समजून घे ना.”
“ काल तू घातलेली साडी खूपच छान होती पण एक सांगू का तुझ्यावर तो रंग नाही खुलत.”
“काय करून ठेवलं आहेस तू या केसांचं? आरशात बघ जरा?”
“तुझं प्रेझेंटेशन चांगलं झालं ते तुझ्या भाषणबाजीमुळे पण तुझ्या विचारात स्पष्टता नाही जाणवली.”
“खरं सांगू का?फोडणीत किंचित हिंग जास्त घातला असतास ना तर तुझा चिवडा अधिक खुमासदार लागला असता बघ.”
असे आणि अशा प्रकारचे अनेक शब्दांचे शालजोडीतले बाण जेव्हा आपल्या झोळीत येऊन टपकतात ना तेव्हा पहिली प्रतिक्रिया हीच असते,” ही व्यक्ती स्वतःला समजते काय?ही कधी कुणाला चांगलं म्हणणारच नाही. सदानकदा नुसती नावंच ठेवत राहते. हिच्यापासून दूरच राहिलेलं बरं. उगीच मानसिक खच्चीकरण होतं ना आपलं! आत्मविश्वासही हरवतो. फुकटचे दुःख का म्हणून कुरवाळत बसायचं?
पण तुमच्या मनात उसळलेल्या प्रचंड रागाच्या याच धोक्याच्या क्षणी तुम्ही थोडे जरी समंजस असाल ना तर “संत तुकारामांचे’ शब्द पुन्हा तुमच्या कानात घुमतील.
निंदकाचे घर। असावे शेजारी। येताति बाहेरी। गुणदोष ।।
तुमच्यातल्या अहंकारी भावामुळेच तुम्हाला तुमच्याबद्दल बोललेलं वाईट काही झेपत नाही पण थोडे तटस्थ व्हा की! सकारात्मक विचार करा. तुम्हाला आज तुमचे निंदक टीकाकार वाटत आहेत तेच तुमचे खरे हितचिंतक आहेत.उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत.
‘चारू’ नावाची माझी एक मैत्रीण होती. तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं. ती स्वतः खूप नीटनेटकी, टापटीपीची आणि स्वतःचं सौंदर्य जपणारी अशी जागरूक व्यक्ती होती. त्यामानाने, तिच्या तुलनेत मी थोडी बिनधास्त, काहीशी बेशिस्त, तिच्या दृष्टीने तर ढगळपगळच होते. त्यावरून ती मला सारखी टोकायची. खूप नावं ठेवायची मला. तेव्हा मला तिचा खूप रागही यायचा. कधी कधी तर मी रागावून तिच्याशी अबोला धरायची पण नकळत त्या अबोल्याच्या काळात मी तिने जे काही दोष माझ्यात दाखवले होते त्यावर विचारही करायची आणि कालांतराने माझ्या लक्षात यायचं की माझ्यात झालेल्या या बदलांमुळे खरोखरच मी एक ‘आकर्षक व्यक्तिमत्त्व’’ म्हणून आता ओळखली जाऊ लागलेय.एकप्रकारचा मेकओव्हरच झाला की माझा आणि त्याला कारण केवळ चारुच. कुठेतरी चारूची भीती माझ्या मनात असायची. “ती काय म्हणेल?” या विचारापायी मी आयुष्यातली एक एक पायरी आकर्षक रित्या रचू शकले. आता चारूचं स्थान माझ्या आयुष्यात नक्की काय होतं? एक मैत्रीण, एक हितचिंतक, एक निंदक की सकारात्मक बदल घडवून आणणारा एक महत्त्वाचा घटक? ”चारु मैत्रीण असावी तर तुझ्याचसारखी,चुका काढणारी.”
एक असतो ‘भाट’ जो तुमचे गुण खुलवतो आणि एक असतो निंदक जो तुमचे दोष दाखवतो आणि नकळतपणे त्या दोषांचा विचार करायला लावून सुधारण्याच्या मार्गावर तुम्हाला तो आणून सोडतो जेणेकरून तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक चमकदार पैलू पडावेत. नकळतपणेही तुमच्या प्रगतीत त्याचं हे योगदान महत्त्वाचं ठरतं म्हणूनच संत तुकाराम म्हणतात
निंदक हा माझा। कंठीचा ताईत ।
त्याने सर्व हित। केले माझे।।
याही पुढे जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात
निंदकाचे घर ।असावे शेजारी। परि चेष्टेकरी। असू नये।।
म्हणजे निंदकांचेही विविध प्रकार असतात. काही निंदक विकारी असतात, मत्सरी असतात, नुसतेच उनाड चेष्टेकरी असतात आणि ते सुधारणेच्या मार्गातले अडसर असतात पण निंदकांमधले हितचिंतक ओळखून त्यांनी दाखवलेल्या आपल्या चुका सुधारण्याचा आपण गांभीर्याने विचार केला तर आपल्यात सकारात्मक बदल घडूच शकतो.
मूळात “निंदक” हा शब्द अनेक प्रश्न आणि विचार घेऊनच सुतार पक्ष्यासारखा मनावर टोकरत राहतो. ‘निंदक’ कुणाला म्हणायचं? जो सतत टीका करतो किंवा आपल्या चुका काढतो, दोष दाखवतो तोच निंदक मग मनात विचार येतो आपल्या जडणघडणीच्या काळात आपले आई-वडील किंवा परिवारातली अन्य प्रिय मंडळीही आपल्या गुणदोषांवर अनेक वेळा टीका करत असतात, बोलतात, चुका दाखवतात पण आपण त्यांना निंदक म्हणतो का? किंवा म्हणू का? नक्कीच नाही. ते आपल्यासाठी संस्कारी शिल्पकार असतात मग हे टीकाकार निंदक कोण? यांचं आपल्या आयुष्यातलं नक्की स्थान काय? सर्वसाधारणपणे हे निंदक बाहेरच्या जगातले असतात आणि बहुतेक वेळा ते तुम्हाला तुमच्या जाणत्या वयात भिडतात. तुमच्या स्वतंत्र, मुक्त जगण्याच्या प्रक्रियेत मानसिक अडथळे निर्माण करण्याच्या रूपात नारदासारखे भेटतात आणि अशाच वेळी संत तुकारामांचा अभंग मार्गदर्शनपर ठरतो.
या निंदकाचं मी काय करू? कसा हाताळू याला? कसा सामोरा जाऊ याला? हा प्रश्न जेव्हा तीव्रतेने बोचकारतो तेव्हा संत तुकाराम एक सकारात्मक विचार आपल्या डळमळणाऱ्या बुद्धीत अलगद घालून जातात.
निंदकाचे घर। असावे शेजारी। येताति बाहेरी। गुणदोष।।
“निंदकाला शत्रू समजू नका. मित्र माना मार्गदर्शकच समजा कारण ते तुम्हाला तुमचे दोष दाखवतात.
“संत कबीर” सुद्धा हेच तत्त्व, हाच अर्थ सांगतात. त्यांच्या दोह्यातून ते म्हणतात,
निंदक नियरे रखिये। आँग कुटी छवाय। बिन पानी साबुन बिना। निर्मळ करे सुभाय।।
याचाही अर्थ हाच आहे की निंदकाला जवळ ठेवा कारण तोच पाण्याशिवाय, साबणाशिवाय आपले मन स्वच्छ करतो.
या लेखाचा समारोप करताना सहज मनात आले की, निंदक म्हणजे एक प्रकारे विरोधक असतो (आणखी एक व्याख्या. निंदक=विरोधक) आणि लोकशाही राष्ट्रासाठी या विरोधकाचे महत्त्व नक्कीच कमी नाही. सत्ताधारी पक्षाला त्यांच्या चुका दाखवून त्या सुधारण्यासाठी आग्रही भूमिका पत्करून समाज कल्याणाचा, जनहिताचा पाठपुरावा करणे म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा राखणे हा लोकशाहीचा एक महान मंत्र आहे. अर्थात तो कितपत साधला जातोय याचा विचार या ठिकाणी करणं अप्रस्तुत आहे म्हणून आता फक्त एवढंच.
*राधिका भांडारकर*
