सिंधुदुर्ग प्लास्टिक मुक्त जिल्हा बनविण्यासाठी प्रयत्न सुरू –
जगदीश खेबुडकर
ई-वेस्ट संकलन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्याला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात आलेल्या ‘प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील ६३२ शाळांनी या मोहिमेत सहभाग घेतला आणि तब्बल ५ हजार ९१७ किलो प्लास्टिक व ई-वेस्ट कचरा जमा केला. या मोहिमेत मालवण तालुक्यातील १६० शाळांनी सर्वाधिक ३ हजार ३७ किलो कचरा गोळा करून आघाडी घेतली आहे. देवगड, कुडाळ, वैभववाडी आणि इतर तालुक्यांतील शाळांनीही यात मोलाचे योगदान दिले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर म्हणाले की, गोळा केलेला हा सर्व कचरा ३१ डिसेंबरपर्यंत संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मिरज येथील संस्थेकडे पाठवला जाणार आहे. सिंधुदुर्गला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख मिळालीच आहे, आता त्याला पहिला प्लास्टिक मुक्त जिल्हा बनवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. या स्पर्धेअंतर्गत 5 हजार 917 किलो प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन झाले. जिल्ह्यातील शाळामध्ये गोळा करण्यात आलेला प्लास्टिक कचरा 31 डिसेंबरपर्यंत गोळा करुन प्रक्रियेकरीता पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.
स्वच्छ जिल्हा, पर्यटन जिल्हा असे नामंकन असलेल्या जिल्ह्याला पहिला प्लास्टिक मुक्त जिल्हा बनविण्याकरीता जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातून काम सुरु करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणुन स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये 15 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीत “प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अहवालाप्रमाणे देवगड तालुक्यात 117 शाळानी सहभाग घेऊन मोहिम कालावधीत 775.17 किलो प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन केले आहे. वैभववाडी तालुक्यातील 67 शाळानी सहभाग घेऊन 636.07 किलो, कणकवली तालुक्यातील 37 शाळानी सहभाग घेऊन 267.10 किलो, कुडाळ तालुक्यातील 37 शाळानी सहभाग घेऊन 671.05 किलो, वेंगुर्ला तालुक्यातील 135 शाळानी सहभाग घेऊन 116.67 किलो, सावंतवाडी तालुक्यातील 37 शाळानी सहभाग घेऊन 203.97 किलो, दोडामार्ग तालुक्यातील 42 शाळानी सहभाग घेऊन 208.38 किलो तर मालवण तालुक्यातील 160 शाळानी सहभाग घेऊन सर्वात जास्त 3 हजार 37.64 किलो प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन केले आहे. यास्पर्धेच्या कालावधीत प्राप्त अहवालाप्रमाणे जिल्ह्यातील 632 शाळानी 5 हजार 917 किलो प्लास्टिक व ई-वेस्ट संकलन जमा केले आहे. या स्पर्धा कालावधीत गोळा करण्यात आलेल्या प्लास्टीक व ई-वेस्ट वर शिवप्रतिज्ञा बहुद्देशिय सेवाभावी संस्था, मिरज जि सागली यांच्या माध्यमातुन पुर्नप्रक्रिया करण्याकरीता पाठविण्यात येणार आहे. सध्यस्थितीत मालवण, सावंतवाडी व कणकवली तालुक्यातील प्लास्टिक व ई वेस्ट गोळा करण्याचे काम सुरु आहे. तर स्पर्धेत सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व शाळामध्ये गोळा करण्यात आलेला प्लास्टिक व ई वेस्ट कचरा दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यत गोळा करुन पुर्नप्रक्रिया करण्याकरीता पाठविण्यात येणार आहे. याकरीता गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, गट संसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) पंचायत समिती सर्व यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधुन योग्य नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांनी दिली आहे.
