You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील ‘गोयकरांना’ अखेर मिळणार लस…

दोडामार्ग तालुक्यातील ‘गोयकरांना’ अखेर मिळणार लस…

जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केले प्रयत्न…

दोडामार्ग

दोडामार्ग:तालुक्यातील रहिवासी असलेले मात्र गोव्यात नोकरीनिमित्त आधारकार्ड बनवून घेतलेल्या युवकांना लस नाकारण्यात आली. याबाबत या युवकांनी तहसीलदार अरुण खानोलकर यांच्याकडे आपली कैफियत मांडली. मात्र ‘तो’ निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक यांचा असल्याने आपण त्यात हस्तक्षेप करू शकत नाही असा खुलासा केल्याने या युवकांच्या लसीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनीही तहसीलदार खानोलकर यांच्याशी चर्चा केली. जिल्हा आरोग्य विभागाच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

दरम्यान तहसीलदार खानोलकर यांनी याबाबत आपण काहीही करू शकत नसल्याचे सांगितल्याने राजेंद्र म्हापसेकर यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी संपर्क साधत या परिस्थितीची जाणीव दिली. अखेर आजच्या दिवशी अपॉइंटमेंट घेतलेल्या युवकांचा प्रश्न सुटत जिल्हा शल्य चिकित्सकांनी दोडामार्ग आरोग्य यंत्रणेला त्या युवकांना लस देण्याचे आदेश दिले. या युवकांनी राजेंद्र म्हापसेकर यांचे आभार मानले.
तर गोवा राज्यातील लोकांना लस देणार नसाल तर तसे लेखी आदेश संबंधित यंत्रणेला द्या, यापुढे तोंडी सूचना अथवा आदेश आल्यास खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा राजेंद्र म्हापसेकर यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा