*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट*
भाग:४४
*हुशार कोण?*
सध्या थंडी फार पडतेय. त्यामुळे काकल्या आज उशीरा आला. म्हणाला, “गावात हुशार कोन रे?” काकल्या काय तरी तर्कट लढवत असावा. मी काही बोललो नाही. “अरे,सादो प्रश्न, इतको उशीर सो. काय तूच तुका हुशार समाजतंस?” काकल्या पुन्हा म्हणाला.
“तसं काही नाही. पण हुशार निश्चित कुणाला म्हणायचे, हा प्रश्न पडलाय. म्हणजे यशस्वी माणसाला हुशार म्हणायचे, तर तो बर्याचदा दोन नंबरवाला असतो. शिक्षणातले हुशार गाव सोडून गेलेत. काही समजत नाही बाबा.”मी काहीतरी आपलं म्हणालो.
“ताच माका सांगूचा आसा. समजत नाय, कोनाक हुशार समजाचो. एखादो पोर अभ्यासात घाशीत आसता, तेवा उनाडको पोर गावातला बरा प्वार पटयता. हेच्यात हुशार कोन? ” काकल्या परत जोरदार बोलला.
“प्रामाणिक धंदो करणारो बे एके बे करीत रवता, दोन नंबरचो धंदो करणारो गळ्यात सोन्याचे चैनी लोंबयत गाडये फिरयता. गाळी घालणाऱ्याक गावात भियातत, सरळ माणसाक कोन इचारीना. बरा शाळेतली हुशारी सोड रे; माडार चढणारे, बावीत उतारणारे, आंबे काढणारे मेळणत नाय. बरो प्रसादी घेणारो, बरो ज्योतिषी मेळणा नाय.”
” मग गावात कोण हुशार नाही म्हणतोस?” मीच काकल्याला प्रतिप्रश्न केला.
“सध्या बरीच मान्सा आधार कार्ड, रेशन कार्ड,सातबाऱ्याचे झेरॉक्स काढतहत आणि पंचायतीत, तलाठी हापिसात, बेंकेत आणि पोष्टात धावतहत. जमा झाल्ले काढून हाडतहत. त्येंकाच हुशार म्हणायचा आता. ” काकल्या तडतडला.
खरंच हुशारीचं कौतुक राहिलं नाहीये. दिखाव्याच्या जगतात पैसा महत्त्वाचा ठरतोय, मग तो कसाही मिळू दे.
“तुका याक सांगतय, ‘गुरूर्ब्रम्हा, गुरूर्विष्णू’ फाटी पडला. आता ‘दुडूर्ब्रम्हा दुडूर्विष्णू’ ह्याच मत्वाचा.” हुशारीची धाव केवळ पैशापर्यंत असल्याचे सांगून काकल्या चालू पडला.
*विनय वामन सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
