राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीने ८६९ प्रकरणे निकाली…
ओरोस
जिल्ह्यात आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण ८६९ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. या प्रकरणांमध्ये एकूण ६ कोटी ३२ लाख ४१ हजार १३५ रुपये इतक्या रकमेची तडजोड झाली.
उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या उपस्थितीमध्ये व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये व जिल्हा न्यायालय, सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी सर्व तालुका न्यायालयात एकूण आठ पॅनेल तसेच जिल्हा न्यायालयात सहा पॅनेल नेमण्यात आले होते. पॅनेल क्र.१ मध्ये जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख व विधीज्ञ श्रीमती प्रणिता कोटकर यांनी काम पाहिले. पॅनेल क्र.२ मध्ये तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. इंदलकर, विधीज्ञ स्नेहल हातकर यांनी काम पाहिले. पॅनेल क्र.३ मध्ये दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व मुख्य न्यायदंडाधिकारी ए. ए. चेंडके, विधीज्ञ कौस्तुभ मर्गज यांनी काम पाहिले. पॅनेल क्र. ४ मध्ये सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व मुख्य न्याय दंडाधिकारी ए. जी. देशिंगकर, विधीज्ञ प्रसाद सावंत यांनी काम पाहिले. पॅनेल क्र. ५ मध्ये दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी आर. व्ही. नडगदल्ली, व विधीज्ञ श्री. तानाजी पालव यांनी काम पाहिले. पॅनेल क्र. ६ मध्ये मा. श्रीमती एस. जे. पाटील, ३रे सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, सिंधुदुर्ग व विधीज्ञ दत्तात्रय देसाई यांनी काम पाहिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव संपूर्णा दा. गुंडेवाडी याही राष्ट्रीय लोक अदालतीसाठी उपस्थित होत्या.
नियुक्त पॅनेल समोर दिवाणी दावे, तडजोडपात्र स्वरुपाची फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, धनादेशाबाबतची प्रकरणे, कर्ज वसुली प्रकरणे व सर्व प्रकारची वादपुर्व प्रकरणे तडजोड होऊन निकाली झाली. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये पक्षकार व विधीज्ञ यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ही राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी होण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयातील सर्व न्यायिक अधिकारी व कर्मचारी यांनी सुमारे दोन महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महत्त्वपूर्ण सहभाग घेतला होता.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ८६९ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. सदर प्रकरणांमध्ये एकूण ६ कोटी ३२ लाख ४१ हजार १३५ रुपये रकमेची तडजोड झाली. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समजोता होऊन निकाल झाल्याने त्यांचेतील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे. तसेच या तडजोडीच्या निकालांविरुध्द अपील होत नसल्याने त्यांच्या वेळेची व पैशाची बचत झाली आहे. घरपट्टी व पाणीपट्टी वसूलीध्ये ग्रामपंचायत कसाल व ग्रामपंचायत रानबांबुळी यांचा उच्चांक गाठला असून लोक न्यायालयामध्ये याबाबतची १२५ प्रकरणे निकाली निघाली.
