*ओप्टीवीस, वेलोट्रीज, ट्रेलब्रेजर्सची बाजी*
*‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन हार्डवेअर स्पर्धेचा उत्साह*
पुणे :
येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ, पुणे येथे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल व एआयसीटीई यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन–२०२५ (एसआयएच–२०२५) स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीत ओप्टीवीस (एआयसीटीई), वेलोट्रीज (रक्षा मंत्रालय) आणि ट्रेलब्रेजर्स (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय) या संघांनी नाविन्यपूर्ण कल्पनांसह विजेतेपद पटकावले. तर इनो-कोर (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय), क्लच एसआयएच (विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय), नेफ्रॉन आणि आरोग्य शिल्ड (दोन्ही केरळ सरकारच्या आरोग्य विभागाचे) यांनी आपापल्या गटात संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला.
एसआयएच–२०२५ या पाच दिवस चाललेल्या राष्ट्रीय हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीसाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव निवडलेले नोडल केंद्र होते. यामध्ये देशभरातून आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, केरळ, जम्मू–काश्मीर, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यांतील एकूण २५ संघांची निवड झाली होती.
या स्पर्धेदरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी एआयसीटीई, रक्षा मंत्रालय, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय तसेच केरळ सरकारच्या आरोग्य विभागासमोरील विविध समस्यांवर पर्यायी उपाय सुचवले. अंतिम फेरीत विविध स्तरांवर प्रत्येक गटातील विजेत्या संघांच्या नवकल्पनांचे परीक्षकांकडून मूल्यमापन करण्यात आले. या सर्व विजेत्या संघांच्या नवकल्पनांना भारत सरकारकडून करंडक, प्रमाणपत्रे व प्रत्येकी दीड लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभासाठी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचे सल्लागार डॉ. राघवप्रसाद दास, ‘एआयसीटीई’चे सहाय्यक संचालक डॉ. राकेश कुमार गंजू, आयआयटी मुंबईचे माजी प्राध्यापक डाॅ.नरेंद्र शहा, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, एसआयच सेंटर प्रमुख गणेश भिसे, नोडल केंद्र प्रमुख डॉ. निशांत टिकेकर, स्पर्धा संयोजक प्रा. सुरेश कापरे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. राघवप्रसाद दास म्हणाले की, एसआयएच–२०२५ ही केवळ स्पर्धा नव्हती, तर विद्यार्थ्यांचा इनोव्हेशन मेळा होता. विद्यार्थ्यांनी आपल्या नवकल्पनांतून भारत सरकारच्या विविध मंत्रालयांसमोरील समस्यांवर सुचवलेले उपाय पाहताना आपण विकसित भारताच्या संकल्पनेपासून आता फार दूर नाही, याची प्रचीती आली. देशातील युवा पिढी ही विकसित भारताच्या वाटचालीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अशा युवकांना त्यांच्या नवकल्पना जगासमोर मांडण्यासाठी एसआयएच–२०२५सारखे उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल भारत सरकारचे त्यांनी अभिनंदन व आभार मानले. तसेच, या स्पर्धेच्या आयोजनासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठात प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रोवोस्ट प्रा. डॉ. सायली गणकर यांनीही विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या विविध समस्यांचा आढावा घेताना भारताच्या विकासासाठी एआय, स्मार्ट ऑटोमेशन यांसारख्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, स्पर्धेच्या अचूक आयोजनासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठातील सर्वांचे त्यांनी कौतुक केले.
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कापरे यांनी केले, आभार डॉ. टिकेकर यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. स्नेहा वाघटकर यांनी केले.
*चौकट : स्पर्धेचा निकाल*
एआयसीटीई – ओप्टीवीस (चंदीगड विद्यापीठ, पंजाब)
रक्षा मंत्रालय – वेलोट्रीज (एसआरएम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तामिळनाडू)
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय – द ट्रेलब्रेजर्स (मेप्को श्लेंक अभियांत्रिकी महाविद्यालय, तामिळनाडू)
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय – इनो-कोर (केजीआयएसएल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोईंबतूर)
विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय – क्लच एसआयएच (दयानंद सागर अभियांत्रिकी महाविद्यालय, बंगळुरू)
केरळ सरकारचा आरोग्य विभाग – नेफ्रॉन (बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, उत्तर प्रदेश)
केरळ सरकारचा आरोग्य विभाग – आरोग्यशिल्ड (एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे)
