हरवलेल्या मोबाईलमुळेच प्रेमी युगुलाची आत्महत्या;
पोलिस तपासात धक्कादायक व्यवहार उघड
कणकवली :
तरंदळे धरणावर उडी घेऊन आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाच्या मृत्यूमागील कारण अखेर उघडकीस आले आहे. सोहम चिंदरकर (१८, कलमठ–कुंभारवाडी) आणि ईश्वरी राणे (१८, कणकवली–बांधकरवाडी) यांच्या आत्महत्येला सोहमचा हरवलेला मोबाईलच कारणीभूत ठरल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी सोहमने आईच्या मोबाईलवरून ईश्वरीला अनेक व्हॉट्सऍप मेसेज केले होते. त्यामध्ये त्याचा मोबाईल हरवला असून त्यात काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ असल्याने बदनामी होऊ शकते, त्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने नमूद केले होते. या संपूर्ण मेसेजिंगमध्ये ईश्वरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती; मात्र सोहम कोणतीही समजूत घालून न घेता ठाम राहिला.
सोहमच्या या निर्णयानंतर ईश्वरीनेही “तुझ्याशिवाय मी कशी जगू? आपण दोघांनीही जीवन संपवूया” असे म्हटल्याचे मेसेजमध्ये स्पष्ट झाले आहे. दोघांनी कुठे भेटायचे हेही मेसेजमधूनच ठरवले व त्यानुसार तरंदळे धरणाची वाट धरली. धरणावर पोहोचताच दोघांनी पाण्यात उडी घेत आत्महत्या केली, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.
दरम्यान, सोहमचा हरवलेला मोबाईल सापडला आहे की नाही, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला आहे.
