You are currently viewing आपण गॉड हियर आहोत की गॉड फियर ?

आपण गॉड हियर आहोत की गॉड फियर ?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*आपण गॉड हियर आहोत की गॉड फियर?*

 

*आपण गॉड हियर आहोत* म्हणजे काय? आपण देवा*चे** ऐकतो की आपण देवा*ला* ऐकतो?

देवाचे ऐकतो असे म्हटले तर लगेच प्रश्न येतो, देव कुणाशी बोललाय? आपल्याशी तर नक्कीच नाही. देवाने त्याच्या आवडीनिवडी कुणाला कधी सांगितल्यात? देवाने कधी म्हटलं “हे बरोबर हे चूक”? मग देवाला काय आवडते,काय नाही आवडत हे कुणी ठरवलं?

सद्गुण आणि दुर्गुणांच्या दोन ढोबळ याद्या ज्यांनी केल्या त्यांना आपण संत, महात्मे, देवदूत, महानायक, ईश्वरी अंश वगैरे मानले आणि सद्गुणांच्या यादीला देवाची आवडती आणि दुर्गुणांच्या यादीला देवाकडून नापास झालेली लक्षणे म्हणून आणि तेच देवाचे सांगणे समजून, आपण सहस्त्र वर्षे याच यादीप्रमाणे देवाचे ऐकण्याचा प्रयत्न केला.

 

“देवाला ऐकतो” याचाही अर्थ खूप व्यापक आहे. देव दिसत नाही पण ऐकू येतो हे मात्र कुठेतरी खूप पटतं. चराचरात देव सामावलेला आहे ही मूळ कल्पना जर तंतोतंत मानली तर निसर्गाच्या विस्तीर्ण पटावर तो आपल्याला निश्चित ऐकू येतो,दिसतोही. वाऱ्याच्या लहरीत, फुलांच्या गंधात, उगवणाऱ्या सूर्य तारे चंद्राच्या प्रकाशात, आकाशात, ढगातून ओघळलेल्या धारांमध्ये, उंच गिरीशिखरांच्या अचलतेमध्ये, अगदी सर्वत्र निर्गुणात्मक रीत्या त्याचं अस्तित्व आपण अनुभवतो आणि कल्पनेतच त्या अस्तित्वाला आकार देऊन ती सगुण आकृती आपल्यासाठी “देव” म्हणूनच आपल्या जीवन प्रवाहात स्थित होते आणि मग त्याच्याशी(त्या देवाशी) आपला मूकपणे, तल्लीनतेने, श्रद्धेने संवाद होतो.

होतो ना?

मग तुम्ही नक्कीच आस्तिक आहात. देवाला मानणाऱ्या आहात. तिथूनच पाप पुण्याच्या पायऱ्या सुरू होतात. याचाच अर्थ देवाला घाबरणे म्हणजे आपली सत्सदविवेक बुद्धी, आपलं गिल्ट, भीरुता, आपल्या हातून वाईट घडल्याची कबुली, पाप झाल्याची रुखरुख, “खाई त्याला खवखवे” अशा प्रकारची मनाची अस्वस्थता आणि ही कुठेतरी नक्कीच देवाला घाबरण्याशी संबंधित असते आणि ज्याला हे जाणवते तो स्वतःला त्याच त्याच चुकीपासून, वाईट मार्गापासून दूर राहण्याचे बजावत राहतो. तो त्याच्या वागणूकीतले दोष आत्मचिंतनाने, शोधक वृत्तीने पाहू शकतो कारण त्याने जो देव त्याच्या मनात साकारलाय त्याला तो निश्चित घाबरतो.(जसं लहान बालक आपल्या मातेला घाबरतं) पुन्हा पुन्हा देवापुढची त्याची स्वतःची प्रतिमा उजळ करण्याचा तो प्रयत्न करत राहतो. तोच खरा पापभीरू, नीतीमूल्ये जाणणारा. तो नुसताच परंपरावादी किंवा देवाचा कोप होऊ नये म्हणून अज्ञानी मनाने पूजा-अर्चा करणारा, अंगारे धुपारे फासणारा, कर्मकांडात चुकीच्या पद्धतीने रुतून जाऊन भरकटलेला कर्मशून्य झालेला नसतो. त्या दृष्टीने जुन्या बुरसटलेल्या, मूर्खासारख्या त्याच्यावर थापलेल्या अंधश्रद्धाळू धार्मिक कल्पनांचा तो बळी न ठरता शुद्ध चित्तवृत्तीने स्वतःची कर्तव्ये करून आणि त्या कुणा महान शक्तीला समर्पित करून स्थितप्रज्ञतेने, स्वीकृत भावनेने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतो तोच देवाचे ऐकणारा आणि देवाला घाबरणारा सच्चा आत्मा असतो. तो जसा सर्वांचा आवडता होतो तसाच देवाचाही आवडता होतो.

या गाईडलाईन्स समजून ठरवा की तुम्ही गॉड हियर आहात की गॉड फियर की दोन्ही?

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा