You are currently viewing लालबागमध्ये २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान ‘विवेकानंद व्याख्यानमाला’

लालबागमध्ये २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान ‘विवेकानंद व्याख्यानमाला’

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे २५ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ६८ वी विवेकानंद व्याख्यानमाला लालबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, गरमखाडा येथे रात्री ८:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. विविध विषयांवर मान्यवरांच्या प्रेरणादायी व्याख्यानांनी समृद्ध होणारी ही व्याख्यानमाला यंदाही श्रोत्यांसाठी ज्ञान, विचार आणि चिंतनाचा सुंदर संगम ठरणार आहे.

२५ नोव्हेंबर रोजी पहिले पुष्प ‘हवामान बदल आणि तरुणाई’ या विषयावर निसर्ग मानसकन्या प्राची शेवगावकर गुंफणार आहेत, तर त्याच दिवशी दुसरे पुष्प ‘श्री संत ज्ञानेश्वर आणि आधुनिक युग’ या विषयावर ह.भ.प. डॉ. हरिदास महाराज पालवे शास्त्री सादर करणार आहेत. २७ नोव्हेंबर रोजी तिसरे पुष्प ‘भाषा : अभिजात आणि बहुजन’ या विषयावर भाषा तज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांची मांडणी असेल, तर २८ नोव्हेंबर रोजी चौथे पुष्प ‘आभासी जगातील पालकत्व’ या विषयावर निवृत्त प्रशासकीय अधिकारी इंद्रजित देशमुख यांचे विचार मांडले जातील.

२९ नोव्हेंबर रोजी पाचवे आणि अंतिम पुष्प ‘एआय : भीती की संधी’ या विषयावर माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ चिन्मय गवाणकर मार्गदर्शन करतील. याच दिवशी ‘विवेकानंद स्मृती’ या जाहिरात अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार असून शेवटच्या दिवशी व्याख्यानमालेचा समारोप चिंतनशील वातावरणात पार पडणार आहे.

या व्याख्यानमालेत रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन व्याख्यानमाला प्रमुख मंगेश सावंत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी विकास शिंदे (मंडळ प्रमुख – ९८७०४२२९५९) आणि मंगेश सावंत (व्याख्यानमाला प्रमुख – ९८२१४२११८६) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा