सावंतवाडी :
आरोस येथे श्री देवी माऊली मंदिरात दरवर्षी नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घाटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत अकरा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अभंग गायन स्पर्धा, निसर्गप्रेमी रानमाणूस श्री प्रसाद गावडे यांचे कोकणातील देवराई व राखणदार याविषयावरील अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, फुगडी, दशावतार नाटक, भजने व धार्मिक विधी इत्यादी कार्यक्रमांच्या विशेष अयोजनांद्वारे श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने यावर्षीही आपले वेगळेपण सिद्ध केले.
श्री निखिल नाईक, संदेश देऊलकर, महेश कुबल, गणपत नाईक, सुहास कोरगावकर, विनायक नाईक, रोषन नाईक, भाई देऊलकर, दत्तगुरू दळवी, बाबा मेस्त्री, सिद्धेश कुबल, नारायण चव्हाण, रितेश नाईक, किरण कळंगुटकर यांनी पुरस्कृत केलेल्या व आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री निलेश परब यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या अभंग गायन स्पर्धेत छोटा गट व खुल्या गटातून कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील विविध गावांतून एकूण ३० स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून गोवा येथील श्री दशरथ नाईक यांनी काम पाहिले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन होडावडा, वेंगुर्ला येथील नावाजलेले निवेदक श्री काका सावंत यांनी केले. हार्मोनियम साथ धाकोरा येथील कु. साहिल घुबे, तबला साथ साटेली येथील कु. अक्षय कांबळी तर ताल्रक्षक म्हणून आरोसचे श्री प्रथमेश परब यांची साथ लाभली. बाबू गोडकर व उत्तम परब यांचे कार्यक्रमाच्या नियोजनात विशेष सहकार्य लाभले. लहान गटातील अनेक स्पर्धकांनी आपल्या आवाजाने रसिकांची मने जिंकली व रसिकांनीही स्पर्धकांच्या कलेला दाद देत बक्षिसांचा वर्षाव केला. लहान गटात प्रथम क्रमांक न्हावेली येथील कु वीर राऊळ, द्वितीय क्रमांक बांदा येथील कु सर्वज्ञ वराडकर, तृतीय क्रमांक कु केतन बिर्जे तर उत्तेजनार्थ पारितोषिक कुमारी कनक काळोजी हिने पटकावले. सर्व विजेत्यांना रोख बक्षीस रक्कम अनुक्रमे रु २५०१/-, १८०१/-, १२०१/- व ५००/- तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गावातील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
खुल्या गटातील स्पर्धकांनीही उत्तम गायन कला सादर करून श्रोत्यांना आपल्या गायनाने मंत्रमुग्ध केले. स्पर्धकांच्या एका पेक्षा एक सरस गायनाने उपस्थितांमध्ये स्पर्धेच्या निकालाची उत्सुकता लागली. खुल्या गटात प्रथम क्रमांक सातोसे येथील कौस्तुभ धुरी, द्वितीय क्रमांक न्हावेली येथील सुरज पार्सेकर, तृतीय क्रमांक आरोसची अन्वी धारगळकर तर उत्तेजनार्थ पारितोषिक हेमंत गोडकर यांनी मिळविले. सर्व विजेत्यांना रोख बक्षीस रक्कम अनुक्रमे रु २५०१/-, १८०१/-, १२०१/- व ५००/- तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गावातील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तर सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
श्री देवी माऊली मंदिर, आरोस येथे पार पडलेल्या या अभंग गायन स्पर्धेमुळे गायन क्षेत्रातील कलाकारांना तसेच आरोस मधील नवोदित कलाकारांना आपल्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांकडून विशेष समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
