महसूल मासानिमित्त प्रशासनातील दीपस्तंभ
लेखक व संकलक अपर जिल्हाधिकारी श्री राजेश खवले
महाराष्ट्राच्या राजपत्रित अधिकाऱ्यांमध्ये ज्या लोकांची त्यांच्या चांगल्या कार्याबद्दल चर्चा आहे त्यामध्ये नागपूर विभागीय कार्यालयात अपर आयुक्त म्हणजे अपर जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत असलेले श्री राजेश खवले यांचे नाव वरच्या क्रमांकामध्ये आहे. या माणसाने आपले शासकीय काम प्रमाणिकपणे सांभाळून त्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून चार ग्रंथांचे यशस्वी संकलन केलेले आहे.
महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चरणी एका अधिकारी अभ्यासकाने म्हणजे श्री राजेश खवले यांनी वाहिलेली ग्रंथपुष्पांजली आहे.
आपण ज्या महापुरुषांना आदर्श मानतो त्यांना हार अर्पण करतो. त्यांना नमन करतो. त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करतो.
महापुरुषांप्रती आदरभाव व्यक्त करण्याच्या विविध पद्धती असू शकतात. परंतु एका अधिकारी अभ्यासकाने आपल्या ग्रंथ साधनेच्या माध्यमातून महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अनोखी आदरांजली वाहिलेली आहे.
आज रोजी महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माहिती देणारे जे सर्वात तीन मोठे ग्रंथ आहेत ते ग्रंथ म्हणजे 1000 पानांचा “क्रांतीरत्न” महाग्रंथ! दुसरा ग्रंथ म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आजवर निघालेला सर्वात मोठा ग्रंथ अर्थात “सावित्रीबाई फुले गौरव ग्रंथ” आणि तिसरा ग्रंथ म्हणजे नुकताच महाज्योती या संस्थेने प्रकाशित केलेला 1242 पानांचा “महात्मा जोतीराव फुले- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समग्र वांड्मय ग्रंथ”.
ज्या अभ्यासकाला महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समजून घ्यावयाच्या आहेत तसेच सत्यशोधक चळवळीचा अभ्यास करावयाचा आहे त्या अभ्यासकाला या तीन ग्रंथांपैकी कोणत्याही ग्रंथाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयीचे हे तीन सर्वात महत्त्वाचे आणि आकाराने सर्वात मोठे ग्रंथ आहेत. या तीनही ग्रंथांच्या निर्मितीमागे एका फुलेप्रेमी अधिकारी अभ्यासकाची धडपड आहे! तो अभ्यासक म्हणजे महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा निस्सिम भक्त व नागपूर विभागीय आयुक्तालयातील अपर आयुक्त श्री. राजेश खवले! लौकिक अर्थाने हा फुले अभ्यासक अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये अपर जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहे. परंतु आपले प्रशासकीय कामकाज सांभाळून व आपल्या प्रशासकीय भूमिकेला पूर्ण न्याय देऊन या अधिकारी अभ्यासकाने फुले दांपत्याविषयी महान अशी ग्रंथ निर्मिती केली आहे. या एका अधिकारी अभ्यासकाच्या जिद्दीतून आणि ध्येयासक्तीतून वर उल्लेखित तीनही ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. त्यांच्या या प्रयत्नामध्ये त्यांना श्री. प्रकाश अंधारे, डॉ. पुष्पाताई तायडे, श्री. प्रकाश लोखंडे, श्री. राहूल तायडे, श्री अतुल दौड, श्री प्रताप वाघमारे , श्री. अशोक गेडाम, श्री राजू यशवंत जाधव, श्री सुनील हुसे, डॉ. दशरथ आदे, डॉ. कमलकिशोर फुटाणे, श्री सतीश जामोदकर, डॉ. प्रमोद उके इत्यादी सहकारी यांचे बहुमोल योगदान लाभले आहे.
अपर आयुक्त श्री राजेश खवले यांनी स्पर्धा परीक्षा तंटामुक्ती, पक्षीशास्त्र, व्यक्तिमत्व विकास इत्यादी विषयावर इतर अनेक विविध ग्रंथ लिहिले असले तरीही त्यांच्या प्रयत्नातून जे महत्त्वपूर्ण ग्रंथ निर्माण झाले त्यामध्ये या तीन ग्रंथांचा अगत्याने उल्लेख करावा लागतो. याशिवाय त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या सहकाऱ्यांसमवेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेल्या 1000 कवितांचा “समतेचे महाकाव्य” हा महाग्रंथ देखील प्रकाशित केलेला आहे.
महापुरुषांना ग्रंथांच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा या अधिकारी अभ्यासाकाचा प्रयत्न खरोखरच अनुकरणीय आहे. एक शासकीय अपर जिल्हाधिकारी आपला शासकीय कार्यभार सांभाळून त्यांनी केलेल्या ग्रंथ निर्मितीच्या त्यांच्या या उपक्रमाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! खरं म्हणजे एवढे मोठे ग्रंथ निर्माण करणे हे काही साधेसुधे काम नाही. एक साधे 100 पानांचे पुस्तक छापायचे म्हणजे आकाशपाताळ एक करावे लागते. पण आमचे अधिकारी अभ्यासक श्री राजेश खवले यांनी या चारही ग्रंथाचे संकलन करून महाराष्ट्राच्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या समोर एक आदर्श ठेवला आहे आज महसूल ग्रंथ मासाचा शेवटचा दिवस. या लेखक असलेल्या कवी हृदयाच्या व समाजासाठी सातत्याने धडपडणाऱ्या आमच्या ह्या अधिकारी अभ्यास मित्राला म्हणजेच अपर जिल्हाधिकारी श्री राजेश खवले यांना मनापासून मानाचा मुजरा.
प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003
