You are currently viewing ♦️बिंज-वॉचिंग : आनंद की व्यसन? ♦️

♦️बिंज-वॉचिंग : आनंद की व्यसन? ♦️

♦️बिंज-वॉचिंग : आनंद की व्यसन? ♦️
🔷 डिजिटल आनंदाच्या अतिरेकाचे मानसिक परिणाम 🔷
आजच्या डिजिटल युगात नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार यांसारख्या प्लॅटफॉर्मवर मालिका, चित्रपट, वेब सिरीज सहज उपलब्ध आहेत. एका बसण्यात ४–५ भाग पाहणे, संपूर्ण सिझन दोन दिवसांत संपवणे – या प्रवृत्तीला बिंज-वॉचिंग म्हणतात. पहिल्यांदा कदाचित हे निरुपद्रवी मनोरंजन वाटते. खरंतर थकलेल्या मनाला थोडा आराम, तणावमुक्ती आणि मनोरंजन मिळते हे खरे आहे.
याची मानसशास्त्रीय बाजू म्हणजे कंटाळा आला असल्यास थोडे थ्रिल, विनोद किंवा भावनिक प्रसंग अनुभवताना डोपामिन नावाचे रसायन मेंदूत स्रवते. यामुळे तात्पुरता आनंद आणि समाधान मिळते. त्यामुळे बिंज-वॉचिंग हे सुरुवातीला मूड सुधारण्याचे साधन ठरते.
पण याची दुसरी बाजू तितकीच गंभीर आहे. जर्नल ऑफ क्लिनिकल स्लीप मेडिसिन (2017) मधील अभ्यासानुसार, बिंज-वॉचिंग करणाऱ्या व्यक्तीमध्ये झोपेचे विकार, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव आढळतो. सतत स्क्रीनसमोर बसल्याने व्यक्तिगत संवाद कमी होतो आणि एकटेपणाची भावना वाढते. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. ग्रांट (2018) यांच्या मते, “कृत्रिम भावनिक अनुभवांची पुनरावृत्ती आयुष्यातील खर्‍या भावनांना बोथट करते,” ज्यामुळे नैराश्य आणि चिंता वाढू शकतात.
बिंज वॉचिंगचे पर्यवसान व्यसनामध्ये किंवा सवयीमध्ये कसे होते? तर प्रत्येक भागाच्या शेवटी येणारा क्लिफहॅंगर मेंदूत तीव्र उत्सुकता निर्माण करतो तसेच ऑटोप्ले फीचरमुळे स्वतःहून थांबण्याची क्षमता कमी होते. मेंदू डोपामाईन लूपमध्ये जातो. याचमुळे एक एपिसोडला न थांबता सर्व एपिसोड पाहिले जातात.
याची सकारात्मक बाजू नाकारता येत नाही. काही मालिकांमधील सशक्त कथा विचारांना चालना देतात, जगाविषयी नव्या दृष्टीकोनातून पाहायला शिकवतात. मित्रांसोबत मालिकांची चर्चा केल्याने सामाजिक बांधिलकी तयार होते. योग्य मर्यादेत बिंज-वॉचिंग तणावमुक्तीचे साधन ठरू शकते. पण वास्तविकता अशी आहे की मलिका/वेब सिरिज सलग पाहिली जाते.
हे व्यसनामध्ये रूपांतरित होऊ नये म्हणून आपणच आपल्याला मर्यादा घातल्या पाहिजेत. म्हणजे मालिका पाहण्यासाठी वेळापत्रक ठरवता येत असेल तर तसे करा. रात्री ठराविक वेळेनंतर स्क्रीन बंद करा. मित्र-परिवारासोबत प्रत्यक्ष भेटीत संवाद वाढवा.
शेवटी एवढंच म्हणता येईल की, डिजिटल जगाचा आनंद घ्या; पण त्याची आयुष्यावर, व्यवहारावर कुरघोडी करू देऊ नका. बिंज-वॉचिंग हे मर्यादेत ठीक आहे, पण अतिरेकाने ते मनोरंजनापेक्षा व्यसन बनू शकते आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकते याचेदेखील भान असावे.

©️ विनायक राजाध्यक्ष
सांगली
*संग्रह अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*

प्रतिक्रिया व्यक्त करा