“सिंधुदुर्गातून मुख्यमंत्र्यांना १ लाख राख्या; भाजपचा रक्षाबंधन विशेष उपक्रम”
सिंधुदुर्ग
रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील भगिनींकडून १ लाख राख्या व शुभेच्छा पाठवण्याचा अभिनव उपक्रम भाजपकडून हाती घेण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबवले जात असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनही १ लाख राख्या पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९२१ बूथवरून किमान प्रत्येकी १०० राख्या गोळा करून त्या भाजप प्रदेश कार्यालयात पाठवण्यात येणार आहेत. हे अभियान ९ ते १२ ऑगस्ट दरम्यान राबवले जाणार असून, त्यानंतर विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना राख्या सुपूर्द करण्यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी जिल्हा व मंडलस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असून, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आणि जिल्हा सरचिटणीस संदीप साटम हे जिल्हा संयोजक म्हणून जबाबदारी सांभाळतील.
मुख्यमंत्र्यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन राख्या जमा करणार असून, इच्छुक महिलांनी आपली राखी, दोरा आणि दोन ओळींचा शुभसंदेश लिफाफ्यात भरून द्यायचा आहे. जेथे कार्यकर्ते पोहोचू शकणार नाहीत, तिथे तालुकास्तरीय भाजप कार्यालयात राख्या जमा करता येणार आहेत.
यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवलेल्या विक्रमी रक्त संकलन मोहिमेनंतर, हे आणखी एक महत्त्वाकांक्षी अभियान यशस्वी होईल, असा विश्वास प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
