You are currently viewing क्षिप्रा मानकर तरुणींचे नेतृत्व करणारी तरुणी 

क्षिप्रा मानकर तरुणींचे नेतृत्व करणारी तरुणी 

अमरावती :

राष्ट्रपतीचा कार्यक्रम असो की राज्यपालांचा किंवा मुख्यमंत्र्यांचा. त्या कार्यक्रमाचे संचालन माझा विद्यार्थी प्रा. डॉ. किशोर फुले यांच्याकडे असते. किशोर हा अकरावीपासून माझ्या तालमीत तयार झालेला आमच्या चळवळीतील कार्यकर्ता विद्यार्थी. त्याने त्याच्या प्रयत्नातून तन मन धनाने प्रयत्न करून स्वतःला चांगले तयार केले. महाराष्ट्रातील एक चांगला वक्ता एक चांगला जनसंपर्क अधिकारी एक चांगला मंच संचालक असा नावलौकिक त्याने मिळविला. आज संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे नाव आहे.

एक दिवस क्षिप्रा मानकर नावाची माझी विद्यार्थिनी अमरावती जिल्ह्यातील मोर्शीवरून माझ्याकडे आली. आणि मला म्हणाली सर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करीत आहात. मला लगेच अर्थ कळला नाही .तिने स्पष्टीकरण दिले .तुम्ही त्या किशोर फुलेंना किती मोठे केले. माननीय राष्ट्रपतीचा कार्यक्रम असो की माननीय राज्यपालाचा कार्यक्रम असो. संचालन किशोर फुलेंकडेच असते. सर मला तुम्ही किशोर फुलेसारखे तयार करू शकता काय ? मला चांगले संचालन कसे करायचे हे शिकवू शकता काय ?

मी क्षणभर काहीच बोललो नाही. क्षिप्राच्या ठिकाणी असणाऱ्या कॉलिटीज मला माहीत होत्या. मला स्तब्ध पाहून ती थोडी कासावीस झाली. आपण सरांना काही जास्तीचे तर बोललो नाही ना असा भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मी तो टिपला. मी तिला म्हटले क्षिप्रा तू इतकी मोठी हो इतकी मोठी हो की तुझ्या कार्यक्रमाचे संचालन करायला आपण किशोरला बोलावू.

ती माझ्याकडे पाहतच राहिली. मी उच्च ध्येय ठेवणारा प्राध्यापक आहे. किशोर फुलेला प्रतिस्पर्धी म्हणून या क्षेत्रात आल्यापेक्षा दुसरे बरेच क्षेत्र आहेत की ज्यामध्ये आपण आपले करिअर करू शकतो. ती चांगली बोलते ती चांगली लिहिते तिच्यामध्ये आत्मविश्वास आहे याची मला जाणीव होती आणि म्हणूनच मी तिला चांगला वक्ता होण्याची शिफारस केली. ती हपचपच झाली.

मला म्हणाली सर खरोखरच मी इतकी मोठी वक्ता होऊ शकेल काय ? मी म्हटलं तुझं वय खूप कमी आहे. तू आतापासून प्रयत्न केला ना तर नक्कीच जीवनामध्ये चांगली वक्ता होशील. फक्त मनापासून हृदयापासून तन मन धनाने तुला प्रयत्न करावे लागतील. त्यावर ती म्हणाली सर मी प्रयत्न करायला तयार आहे .फक्त तुम्ही मला वेळोवेळी मार्गदर्शन करीत रहा. मी तिला तसे आश्वासन दिले. आमची मुलं आमच्या पायावर उभी राहिली. चांगली भाषण द्यायला लागली. चांगल्या कविता म्हणायला लागली तर कोण्या गुरूला आनंद होणार नाही. ती कामाला लागली. राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मोर्शीचे श्री शिवाजी महाविद्यालय गावात होणारे कार्यक्रम यामध्ये सहभागी होऊ लागली.

काल आम्ही अमरावतीच्या मोर्शी रोडवरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयएएस झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवला होता. कार्यक्रमाला कलेक्टर डीएसपी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेच्या आयुक्त आल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन करायला क्षिप्रा मानकर यांना बोलाविले होते. मी श्री संत ज्ञानेश्वर सभागृहात येताच ती माझ्याजवळ आली.आणि माझ्या पाया पडली आणि मला म्हणाली सर आज मी जी काही आहे ती तुमच्यामुळेच आहे.

आता चित्र बदलले आहे. महाराष्ट्रात कुठेही माननीय राज्यपालाचा कार्यक्रम असो की माननीय मुख्यमंत्र्यांचा त्याचे संचालन असते ते क्षिप्राकडेच. परवाला सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या तीर्थस्थळीला मा.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा आहे. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आहे ते क्षिप्रा मानकरकडेच. क्षिप्रा आता अमरावती पुरती मर्यादित राहिलेली नाही. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही ती वक्ता म्हणून तसेच संचालिका म्हणून जायला लागली आहे. ती कोणतीही नोकरी करीत नाही. वक्ता व संचालन हीच तिची नोकरी आहे. तिच्या ठिकाणी वाणी आहे लेखणी आहे शैली आहे. या त्रिसूत्रीचा अवलंब करून ती आता पूर्ण महाराष्ट्रभर नावलौकिकास आलेली आहे.

ती स्वतः या सर्व कामात व्यस्त असताना देखील ती इतर तरुणींना तयार करीत आहे. त्यांचे संघटन तयार केले आहे. तिला खूप विपरीत परिस्थितीशी झुंज द्यावी लागली. अवेळी बाबा गेले. अनेक सुखदुःखांना तोंड द्यावे लागले. पण ती घाबरली नाही. ती स्वतःच्या पायावर उभी राहिली. आपल्या मुलालाही शिवबालाही तिने चांगले तयार केले आणि त्याचबरोबर तिने इतर तरुणींना नेतृत्व करण्याचे धडे देणे सुरू केले. आम्ही पुढे चालू हा वारसा असा संदेश तिने मला या तिच्या वागणुकीतून दिला आहे.

क्षिप्रा आज महाराष्ट्र पातळीवरील वक्त्ता झाली असली तरी तिचे पाय जमिनीवरच आहेत. आमचा धारणी चिखलदरा हा आदिवासींचा भाग. डोंगराळ भाग. पण त्या भागातही ती सामाजिक काम करायला लागली आहे. त्यांच्यासाठी काम करताना तिला मानधनाची अपेक्षा नाही. प्रवास खर्चाची अपेक्षा नाही. या लोकांना या परिस्थितीतून कसे बाहेर काढता येईल यासाठी सातत्याने तिच्या परीने ती कार्यरत आहे.

अशा या विपरीत परिस्थितीतून पुढे आलेल्या आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या आमच्या ह्या विद्यार्थिनीला पुढे जाण्यासाठी मी जे तिच्या प्रारंभिक अवस्थेमध्ये जे बळ दिले त्याचा मला अभिमान वाटतो. संचलन शिकायला आलेली मुलगी आज संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक विषयावर महिलांच्या विषयावर ओघवत्या शैलीमध्ये लोकाभिमुख वाणीमध्ये आपले विचार मांडते ही खरोखरच जमेची बाजू आहे. अशा आमच्या ह्या लेकीला भवितव्यासाठी हार्दिक शुभेच्छा. मी तिला जी शिकवण दिली ती शिकवण तिने तिच्या संपर्कात येणाऱ्या इतरांना द्यावी व त्यांनाही स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे करावे. एवढीच तिच्यापासून अपेक्षा आहे.

 

प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे

संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा