You are currently viewing जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन – मालवण भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू मोंडकर 

जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन – मालवण भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू मोंडकर 

मालवण :

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा केंद्र व राज्य सरकारने जाहीर केला असून देशविदेशातुन दरवर्षी दहा लाखापेक्षा जास्त पर्यटक जलक्रीडा पर्यटनासाठी मालवण दांडी चिवला बीच, तारकर्ली, देवबाग, भोगवे समुद्रकीनारी तसेच कर्ली खाडी याभागात स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा पर्यटनाचा आस्वाद घेतात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलक्रीडा व्यवसाय हा जिल्ह्यातील स्थानिकांनी कुठल्याही शासकीय अनुदाना शिवाय चालू केला असून स्कुबा डायव्हिंग, कयाक रायडिंग, डॉल्फिन सफर, जेटस्की, स्पिड बोट, बनाना, बम्पर, पॅरॅसिलिंग रायडिंग सेवेच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देऊन विशेषतः मालवण तालुका देशविदेश स्तरावर पोचला आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यवसायिकांना अनेक समस्या सामोरे जावे लागत आहे.

जलक्रीडा व्यवसायिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था पदाधिकारी तसेच जलक्रीडा व्यासायिकांच्या वतीने भाजपा मालवण तालुका अध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्या मार्फत भेट घेण्यात आली.

यावेळी जलक्रीडा व्यावसायिक समस्या मांडण्यात आल्या. त्यामध्ये दरवर्षी 25 मे ला शासन जलक्रीडा व्यवसाय बंदी कालावधी सुरु करते त्यांची मुदत वातावरणाचा अंदाज घेऊन बंदी कालावधी 10 जून पर्यंत वाढविणे गरजेचे आहे. नदी, खाडी, तलाव क्षेत्रात जलक्रीडा प्रकल्पसाठी पावसाळी वादळी वातावरण वगळता बारमाही परवानगी आवश्यक आहे. दरवर्षी नौका सर्वे होऊन नौका फिटनेस सर्टिफिकेट मिळण्यासाठी वर्षभराचा कालावधी होऊनही नौका फिटनेस सर्टिफिकेट मिळत नाही. त्यासाठी तालुका स्तरावर पर्यटन हंगाम सुरु होताना नौका फिटनेस कॅम्प आयोजित करून जलक्रीडा व्यावसायिकांना नौका फिटनेस दाखला देण्यात यावा. तसेच सदर दाखला देणारा अधिकारी मुंबई येथे नियुक्त असल्याने जल पर्यटन हंगाम चालू होताना त्यांची नियुक्ती जिल्हा स्तरावर करण्यात यावी.

स्कुबा डायव्हिंग साठी अधिकृत परवानगी द्यावी. जलपर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी स्थानिक जलपर्यटन व्यावसायिक व राज्य सरकार यांच्या समन्वयाने व्यावसायिक पॉलिसी बनवावी. जलक्रीडा परवानगी पर्यटन संचालन व बंदरे विभाग यांच्या समन्वयाने एक खिडकी पद्धतीने जिल्हास्तरावर देण्यात यावी. जलक्रीडेसाठी किनारपट्टीवर डोअरस्टेप वाहनाद्वारे पेट्रोल पुरविण्याची पॉलिसी बनवावी. सुनामी आयलंड पुनर्स्थापित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. कोळंब खाडी तसेच हॉटेल सायबा समोरील परिसरातील गाळ काढून जलपर्यटन प्रकल्पासाठी परिसर विकसित करावा. आडारी गणेश मंदिर समोरील परिसर खाडीतील गाळ काढून मँग्रोज सफर जलक्रीडा प्रकल्पासाठी विकसित करण्यात यावा. अधिकृत परवानगी धारक जलक्रीडा व्यवसायिकांच्या बुकींग, मार्केटींगसाठी पर्यटन संचनालय व मेरीटाईम बोर्ड यांनी एकत्र वेब पोर्टल सुरु करावे जेणेकरून व्यावसायिक सुसूत्रता येऊन शासनास महसूल वाढ होईल ह्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यावर निलेश राणे यांनी जलक्रीडा व्यवसायिकासोबत मी असून राज्यसरकार कडून आवश्यक ती मदत जलक्रीडा व्यावसायिकांना करणार असून लवकरच संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाची मिटींग मंत्रालय मुंबई येथे स्थानिक जलक्रीडा व्यवसायीक या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांच्या सोबत घेऊन जलक्रीडा व्यावसायिकांच्या समस्या दूर करण्यात येतील असे सांगितले अशी माहिती विष्णू मोंडकर भाजपा तालुका अध्यक्ष यांनी दिली. यावेळी कणकवली मा. नगराध्यक्ष समीर नलावडे, तारकर्ली पर्यटन संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, पर्यटन महासंघ जलक्रीडा अध्यक्ष मनोज खोबरेकर, रामा चोपडेकर, मनोज मेथर, कन्हया तांडेल, अन्वेषा आचरेकर आदी जलपर्यटन व्यवसायिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा