*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*” परीसस्पर्श “*
हात सुटता लेकरू
माऊलीच्या मागे धावे
जरी रडून थकली
तरी वाहती आसवे ||
हात आईचा धरून
होती बाजार बघत
गर्दीमधे रेटारेटी
हात सुटे क्षणार्धात ||
आई आई हाका मारी
आसवांचा बांध फुटे
उसासून गळ्यामध्ये
हुंदकाही मग दाटे ||
शोध घेई चहूदिशी
तिला काहीच कळेना
दाटलेल्या डोळ्यांना
स्पष्ट काहीच दिसेना ||
डोळे करून कोरडे
थोडी भानावर येई
जीव अधीर बनला
हाक आईचीच येई ||
हाक ऐकून हरखे
आई धावली ओढीने
तिला बघता सामोरी
जीव वेडा आनंदाने ||
माय लेकीच्या मिठीत
झाले स्पर्शच बोलके
त्यांचे वर्णन करण्या
शब्द होती मुके मुके||
*ज्योत्स्ना तानवडे.पुणे*
