You are currently viewing सदा आयुष्याची माती …

सदा आयुष्याची माती …

जागतिक मराठी “साहित्य कला व्यक्ती” विकास मंचच्या सदस्या, विविध पुरस्कार प्राप्त जेष्ठ कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार यांची काव्यरचना

पायतळी हिरवळ परवड नशिबात
काय उपयोग आहे.. पिकवून साळभात
दैन्य सरले ना कधी नाही संपणार कधी
देवा आमुच्या साठीच आटते रे कशी नदी….?

 

अंगावरती धडुते .. फाटकीच नशिबात
घेतो जुंपून घाण्याला देवा पहा दिनरात
कष्ट करूनी ही यश का रे नाही येत हाती
टाक सटीचा कसा रे सदा आयुष्याची माती ….

 

सदा भेगाळती पाय पायतण ना पायाला
गवसणी घालतो मी तरी पहा ना मळ्याला
बारा महिने राबतो नाही ऋतू मी बघत
किती आटवावे देवा सांग ना रे तू ..रंगत

 

कशा उजवाव्या पोरी कशी शिकवावी पोरे
नाही कडबा कुटार जगवावी गुरे ढोरे
नाही कोरड्यास देवा भाकरच रिचवावी
कधीतरीच तरी ही गाठ तोंडाशी पडावी ….

 

कट्टाळलो देवा आता म्हणूनच घेतो फास
मेल्या वरच मिळतं अनुदान पहा खास
आमदार खासदार मग काढतील फोटू
मढ्यावरचं ही लोणी घेतील ते लाटू लाटू …

 

मेला माणूस येथला राहिलीत सारी मढी
मयताला विकतोच महा माझी बैलजोडी
नको लेकरांना कांच सोय करूनीच जातो
नको करू शेतकरी जाऊन देवाला सांगतो ….

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ३० ॲाक्टोबर २०२१
वेळ : १२:३४ दुपारी

प्रतिक्रिया व्यक्त करा