You are currently viewing काळ खातलो

काळ खातलो

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*

 

*काकल्याचे तर्कट-१०*

 

*काळ खातलो*

 

चैत्र महिना मला आवडतो. जसा हा फळाफुलांचा महिना आहे, तसाच पाडवा, रामनवमी, हनुमान जयंती अशा सुंदर उत्सवांचाही हा महिना आहे. आज माझ्याकडे काकल्या बोंडू घेऊन आला होता. जवळपास काजूसकट वीसेक बोंडू होते. मी म्हटलं, “कशाला एवढे आणलेस?” तर म्हणतो, “कित्या? तुका बोंडवात रस नाय? काय हाली बोंडवाकच रस नाय.”

“अरे, मी एकटाच खाणारा. घरात कोणाला नाही आवडत.”

“बरोबर. झिलाक तेरेखोलचो बोंडवाचो रस आवाडतलो. माझ्या धाकोऱ्याचे बोंडू तेका नको.” नेहमीप्रमाणे काकल्या आमच्या चिरंजीवावर घसरला. मी म्हणालो, “अरे आताची पिढी वेगळी. त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या. त्याना आपण समजून घ्यायला हवं.”

काकल्या वैतागला, म्हणाला, “अरे काय समजून घेवक् हया रे. हेंच्यानी खाण्याची वाटच लायलीहा. हेंका पेज नको, भाकरी नको, भाजी नको. होया काय तर भाजीपाव, वडोपाव, केक, पिझ्झा, बर्गर आणि चायनीज. पिवक् हेंका ताक नको, निवळ नको, आंबील तर नायशीच झालीहा. निस्ते दिसभर थंडा मारतले.”

थोडावेळ थांबून काकल्या परत म्हणाला की, “माका याक समाजना नाय, गावचे लोक नाश्ट्याक हाटेलात कसे जातत? शहराचा सोड रे. तिकडे नोकरी करणारे असतत, येकटे रवणारे असतत; पण हडे गावात सक्काळफुडे हाटेलात? हेंच्ये बायले करतत तरी काय? आमच्याच गावात्सून सकाळी तीन पाववाले पाँ पाँ करीत जातत. हेचो अर्थ घरात कोन भाकरी थापना नाय.” काकल्या बरोबर बोलत होता.

“ह्या बग आपून खावच्ये येळे बदलले आणि खावच्ये जिन्नसय बदलले. भातशेतीच कमी केली आणि तांदळाचे पदार्थ इसरत चल्लो. अरे, दोन वर्सा झाली शिरवाळे खाल्यार. ह्या बघ, हयता असाच नयीन, भायला खात रवलो तर येक दिस आपणाकच काळ खातलो ह्या धेनात घे.” आजचं काकल्यापुराण संपलं अन् मी निःश्वास टाकला.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा