शासकीय विश्राम गृहावर झाली पदाधिकाऱ्यांची बैठक
वैभववाडी –
नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या धर्तीवर विचारविनिमय करण्यासाठी आणि निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आज वैभववाडी शासकीय विश्राम गृहावर राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली गाव विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस तथा वैभववाडी तालुक्याचे निरीक्षक रुपेश जाधव, तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर यांच्यात चर्चा झाली.
यावेळी देवगड विधानसभा युवकचे अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, युवक जिल्हा सदस्य जयेश परब, रविभूषण लाड आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले कि वैभववाडी शहरात आणि तालुक्यात राष्ट्रवादी वाढत आहे. या निवडणुकीत शहर विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेऊन राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार आहे. आता किती जागांवर आम्ही लढू हे आता सांगता येणार नाही, मात्र पक्षाची ताकद निश्चितपणे पहायला मिळेल.
राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस तथा वैभववाडी तालुक्याचे निरीक्षक रुपेश जाधव म्हणाले कि वैभववाडी तालुक्यात आमची निश्चित ताकद आहे. तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वात चांगलं काम करत आहेत. त्यांनी पक्षाची बांधणी चांगली केली आहे. तरी नगरपंचायत निवडणुकीत पदाधिकाऱ्यांशी झालेली चर्चा जिल्हाध्यक्षांसमोर ठेवली जाईल. तसेच या निवडणुकीत राष्ट्रवादी पूर्ण ताकद लावेल असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीचा धर्म पाळणार अनंत पिळणकर
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाधयक्ष तथा नवीन कुर्ली गाव विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर म्हणाले, जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष झपाट्याने वाढत आहे. अलीकडच्या काळात राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांचा ओघ वाढत आहे. वैभववाडी तालुक्यातही पक्ष संघटना मजबूत होत आहे. या पार्श्वभूमीवर येथील नगरपंचायत निवडणुकीत पक्षाने पूर्ण ताकदीने उतरावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र राज्यात आम्ही शिवसेना आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीत आहोत. त्यामुळे यापुढच्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढवल्या जाव्यात असे वरिष्ठ नेत्यांचे आदेश आहेत. आम्हीही महाविकास आघाडीचा धर्म पाळणार आहोत. मात्र येथील कार्यकर्त्यांची भावना आमचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यापर्यंत पोचवून पुढचा निर्णय घेतला जाईल. पक्षाची ताकद लक्षात घेता त्याप्रमाणे येथील निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढताना जागांवर आमचा लक्ष असेल असे ते यावेळी म्हणाले.