राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा अर्चना घारे पंढरीच्या वारीमध्ये सहभागी
सावंतवाडी
महान संत परंपरा असलेल्या महाराष्ट्र राज्यातून पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होणारे अनेक महान संत होऊन गेले. या संतांनी स्थापन केलेल्या वारकरी सांप्रदायातील अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या वारीला सुरुवात झाली आहे. यापैकी सर्वात मोठा पालखी सोहळा असणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ होत असताना दिवेघाटातील अवघड चढणीच्या प्रवासात खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब सहभागी झाल्या आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.

मातीवरील भेगा आल्या तळपायावरी।
तरी चुकली नाही पंढरीची वारी।।
या उक्तीप्रमाणे वारीमध्ये दरवर्षी न थकता, न चुकता पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेले लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने जात असतात.
लाखो वारकरी, शेकडो दिंड्याच्या माध्यमातून कोणताही गडबड गोंधळ न करता, अतिशय शिस्त बद्धपणे मार्गक्रमण करत असतात. वारीमध्ये लहान – मोठा, उच्च – नीच, गरीब – श्रीमंत असा भेदाभेद नसतो. लहान मोठे सर्वजण एकमेकांना माऊली संबोधून चरण स्पर्श करतात. कोणताही भेदाभेद न करता सामाजिक एकतेचा संदेश देखील वारी मधून मिळतो.
ओठांवर पांडुरंगाचे नाव, हातात टाळ-मृदुंग-पताका पायांना लागलेली पंढरीची ओढ हे सगळं पाहूंन मनाला अध्यात्मिक शांती लाभते. वारीमधून मिळालेलं समाधान हे जगण्याला मोठी ऊर्जा देणारे समाधान आहे. भावना यावेळी सौ. अर्चना घारे यांनी व्यक्त केल्या.

