न्हावेली येथील नाट्य कलाकार लवू पार्सेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

न्हावेली येथील नाट्य कलाकार लवू पार्सेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

न्हावेली येथील नाट्य कलाकार, डंपर चालक लवू पार्सेकर यांचे अल्पशा आजाराने निधन..

सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली गावातील नाट्य कलाकार लवू पार्सेकर यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. लवू पार्सेकर हे अविवाहित होते. ते ५१ वर्षे वयाचे होते. न्हावेली गावातील पहिला डंपर चालक म्हणूनही त्यांना ओळखले जायचे. अनेक युवकांना डंपर चालवायचे प्रशिक्षण देऊन त्यांनी रोजीरोटीला लावले होते. त्यामुळे कित्येक ड्राइवरांचे ते गुरू होते.
लवू पार्सेकर हे हसतमुख आणि मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांचा जनसंपर्क दांडगा होता, त्यामुळे त्यांच्या अकाली निधनानंतर पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येते. गरजवंतांच्या मदतीस धावून जाण्याच्या वृत्तीमुळे अनेकांच्या हृदयात त्यांनी आपली वेगळी जागा निर्माण केली होती.
सांस्कृतिक मंडळांच्या आयोजित नाटकांमधून ते अभिनय करायचे. नाटकात व्हीलनची भूमिका ते अजरामर करायचे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे पंचक्रोशीत ते एक गुणी कलावंत म्हणून परिचित होते. नाटकात जरी व्हीलनची भूमिका केली तरी कायम हसत असणारे लवू पार्सेकर वास्तव जीवनात मात्र हिरो होते. त्यांच्या अकाली जाण्याने न्हावेली गावाने एक गुणी नाट्य कलाकार आणि एक चांगली व्यक्ती गमावल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा