*कणकवलीत जुगाराचा अड्डा तेजीत*
*जागा बदलून बसतात जुगाराची मैफिल*
कणकवलीच्या आजूबाजूला जुगाराचा अड्डा तेजीत सुरू असून पोलिसांना चकवा देण्यासाठी जागा बदलून जुगाराच्या मैफिली सजविल्या जातात. या जुगाराड्यांचे स्टेरिंग खाजगी बसचा ड्रायव्हर म्हणून ओळखला जाणारा “मोरजेचा नितल्या” आणि “डॅडी” या नावाने तक्षिमदार ओळखला जाणारा “घाईत” असलेला इसम यांच्या हाती आहे. पानावर लोड असला की हात चलाखी करून ते पान खालून टाकण्याची कला मोरजेच्या नितल्याकडे असल्याने या जुगाराच्या मैफिलीत त्याची पैशांची कमाई सुद्धा भरपूर आहे.
शिवडी हायस्कूलच्या मागे कळसुली जंगलात, पाचवा मंदिराच्या मागील जंगलात बीट अंमलदार धापू वरात आणि एनसीपीच्या आशीर्वादाने जुगाराच्या मैफिली नेहमीच सजविल्या जातात. काल रात्री अशाच प्रकारची जुगाराची लाखोंची उलाढाल झालेली मैफिल हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील लॉज मध्ये बसली होती. या मैफिली बसविण्यासाठी “धापू वरात” या खाकिच्या शिलेदारला दिवसा पाच हजार रुपये शिवाय बैठकीचे वीस हजार रुपये जुगार्यांकडून पोच होतात. त्यामुळे मिळणाऱ्या अवैद्य धंद्याच्या पाकिटाशी इमान राखत आपल्या खाकी वर्दीशी बेइमानी करणारा धापु वरात जुगाराबद्दल जागृत नागरिकांनी तक्रार दिल्यानंतर जुगाराचा मुख्य ड्रायव्हर मोरजेचा नितल्या याला फोन करून “आम्ही काही वेळात पोहोचतो तोपर्यंत तुम्ही तुमची मैफील दुसरीकडे हलवा” असा निरोप देतो. त्यामुळे पोलीस पोचेपर्यंत ज्या ठिकाणी जुगाराची मैफिल बसली होती तिथे कोणीच भेटत नाही आणि मिळालेली खबर चुकीची ठरवून पोलीस मात्र मूग गिळून गप्प बसतात. धापूचा निरोप आल्यानंतर मैफिल हलविण्याची जागा सुद्धा धापू आणि जुगाराचे मुख्य सूत्रधार यांनी ठरविलेली आधीच फिक्स केलेली जागा असते. सावंतवाडी, कट्टा, मालवण, कणकवली येथील तक्षिमदार या मैफिलींमध्ये मुख्य रोल निभावतात. कणकवली पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी जागृत नागरिकांनी केली आहे.