बांदा
मडुरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे छप्पर काल मध्यरात्री कोसळले. यात वासे व मंगलोर कौलांचे नुकसान झाले. दोन दिवसातच शाळा सुरु होण्याच्या अगोदर ही दुर्घटना झाल्याने मोठा अनर्थ टळला. गेली दोन वर्षे छप्पर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, शिक्षण विभाग अधिकार्यांच्या चालढकल कारभारामुळे सदर दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मडुरा प्राथमिक शाळा नं. ३ चे छप्पर नादुरुस्त झाले होते. त्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत व शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते. मात्र, अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता अशी वेगवेगळी कारणे पुढे करुन चालढकल करण्यात येत होती. मडुरा शाळा नं. १ ची सुद्धा अशीच अवस्था आहे. धोकादायक इमारतीमुळे त्याठिकाणी प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत नाही. मात्र, शाळा सुरु करण्यास प्रशासनाचा विरोध नाही अशी हास्यास्पद परिस्थिती आहे.
मडुरा सरपंच उदय चिंदरकर, माजी उपसरपंच विजय वालावलकर, दिनेश नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर यांनी नुकसानीची पाहणी केली. दोन दिवसातच शाळा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने छप्पराची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.