अधीक्षक अभियंता अनामिका चव्हाण व शाखा अभियंता विजय चव्हाण यांची भेट घेत ग्रामस्थांनी केले आभार व्यक्त
सावंतवाडी
आंबोली चौकुळ रस्त्याला दोन्ही बाजूने कॅट आय रेडियम रिफ्लेक्टर लावल्याने चौकुळ ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुके असते. या रस्त्यावर पर्यटकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते. चौकुळ येथील अनेक युवक आंबोली घाटात पावसाळ्यात हॉटेल व्यवसाय करण्यासाठी येत असतात. दिवसभर आपला व्यवसाय करून रात्री घरी जात असताना धुक्याचा प्रचंड सामना करावा लागतो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात राखीव वनक्षेत्र असल्याने जंगली प्राण्यांची प्रचंड वर्दळ असते . धुक्यात रात्री च्या वेळी वाहनधारकांना रस्त्याचा अंदाज अजिबात येत नाही. त्यामुळे छोट्या मोठ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले होते. हि अडचण लक्षात घेता चौकुळ चे माजी सरपंच विजय गावडे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेस्त्री यांनी वर्षभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देत आंबोली ते चौकुळ या रस्त्याला दोन्ही बाजूला रात्रीच्या वेळी रस्त्याची बाजू समजण्यासाठी रेडियम कॅट आय रिफ्लेक्टर बसवण्यासाठी मागणी केली होती.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अनामिका चव्हाण शाखा अभियंता विजय चव्हाण यांनी या मागणीकडे गंभीरतापूर्वक लक्ष देऊन निधी मंजूर करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे रिफ्लेक्टर बसवले.
यासाठी चौकुळ ग्रामस्थांनी अधीक्षक अभियंता अनामिका चव्हाण व शाखा अभियंता विजय चव्हाण यांची कार्यालयात भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. नेहमीच उपोषणाची व तक्रारींची निवेदने स्वीकारणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी केलेल्या अभिनंदनामुळे सुखद धक्का बसला. यावेळी अभिजित मेस्त्री, राजाराम गावडे, सिताराम गावडे, जगी गावडे ,गंगाराम गावडे ,सुनील मेस्त्री, आकाश मेस्त्री, भाई गवस व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.